२०२०-२१ या वर्षाकरिता अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी गटांना कृषी यंत्र बँक स्थापन करणे या प्रकल्पासाठी कोरची तालुक्याची निवड झाली आहे. तालुक्यातील नोंदणीकृत शेतकरी गटांनी विहित नमुन्यातील अर्ज संपूर्ण कागदपत्रांसह १० मार्चपर्यंत तालुका कृषी अधिकारी कोरची यांच्याकडे सादर करावे.
प्राप्त होणाऱ्या अर्जाची उपविभागीय अधिकारी महसूल यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीसमोर अर्जाची छाननी करून अंतिम यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे. या योजनेत ट्रॅक्टर, रोटावेटर, नांगर, चिखलणी यंत्र, पेरणी यंत्र व केजविल यांचा समावेश आहे. योजनेकरिता शेतकरी गटांना ९० टक्के अनुदान मिळणार आहे. कोरची तालुक्यातील अधिकाधिक शेतकरी गटांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कुमारी विद्या मांडलिक यांनी केले आहे.