डिमांड भरली : २ हजार ५१४ शेतकऱ्यांना फटकागडचिरोली : विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत ३० हजार आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढविणेबाबतच्या योजनेतून कृषी विभागाने आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना कृषीपंप वाटप केले. त्यानंतर वीज जोडणीसाठी डिमांडच्या स्वरूपात महावितरणकडे २ कोटी १ लाख रूपये ९१ हजार रूपये अदा केले . मात्र गेल्या दोन वर्षांपासून तब्बल २ हजार ५१४ शेतकऱ्यांच्या कृषीपंपाना वीज जोडणी देण्यात आली नाही. परिणामी या शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत ३० हजार आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषीपंप वाटप व कृषी जोडणीची योजना हाती घेण्यात आली आहे. कृषी विभागाने सन २०१३-१४ मध्ये या योजनेंतर्गत १ हजार ३७५ व सन २०१४-१५ मध्ये १ हजार ९१७ असे एकूण ३ हजार २९२ लाभार्थ्यांना कृषीपंप व वीज जोडणीसाठी पात्र ठरविले. यापैकी महावितरणने केवळ ७७८ शेतकरी लाभार्थ्यांच्या कृषीपंपाना वीज जोडणी दिली आहे. तसा अहवाल महावितरणकडून जानेवारी २०१६ मध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. कृषी विभागाने १ हजार ९१७ लाभार्थ्यांच्या कृषीपंपाच्या जोडणीसाठी १ कोटी ३५ लाख ९० हजार व १ हजार ३७५ लाभार्थ्यांचे ६६ लाख असे एकूण २ कोटी १ लाख ९१ हजार रूपये डिमांडच्या स्वरूपात महावितरणाकडे वर्ग केले आहे. मात्र कृषीपंपाना वीज जोडणी देण्याच्या कामात गती नसल्याचे दिसून येते. कृषी विभागाच्या वतीने आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना १०० सवलतीवर कृषीपंप व वीज जोडणी देण्याची ही योजना आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
दोन वर्षांपासून कृषिपंपांना वीज नाही
By admin | Published: November 04, 2016 12:14 AM