धानोरा तालुक्यात खरीप हंगामात शेतकरी धान, सोयाबीन, कापसाचे उत्पादन घेतात. खरीप हंगामानंतर अनेक शेतकरी मका, उन्हाळी धान, भाजीपाल्याची लागवड करतात. अनेक शेतकऱ्यांनी शेतात विहिरीचे खोदकाम केले आहे, परंतु वीज जोडणी नसल्याने डिझेल इंजिनमार्फत भाजीपाला पिकाला पाणीपुरवठा करावा लागत आहे. एक वर्षाचा कालावधी उलटूनही अद्यापही वीज जोडणी का मिळाली नाही, असा सवाल शेतकरी व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे डिमांड भरल्यानंतर एका महिन्याच्या आत वीज जोडणे देणे आवश्यक असते, परंतु महावितरण कंपनीचे अधिकारी या नियमाकडे दुर्लक्ष करतात. महावितरणच्या या कारभाराविषयी धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. कृषी विभागानेही या प्रश्नाबाबत पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
धानाेरा तालुक्यात मागील दाेन वर्षांत अनेक शेतकऱ्यांनी शासकीय याेजनेतून सिंचन विहिरींचे बांधकाम केले. या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे जाेडणीसाठी अर्ज सादर केला आहे.