काेरची तालुक्यात पाऊस आल्याने शेतकरी युरियासाठी धडपड करीत आहेत.
मात्र, १५ ऑगस्टपासून युरिया खताचा पुरवठा तालुक्याला झालेला नाही, असे अधिकारी व कृषी केंद्र संचालक सांगत आहेत. यावर शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. परिणामी ठिकठिकाणी फिरून हवालदिल झालेला शेतकरी मिळेल त्या भावात दूरवरून युरिया आणत आहे. मागील आठवड्यात आरसीएफ कंपनीचा युरिया व सुफला १५.१५.१५. या खताचा पुरवठा करण्यात आला. परंतु, कोरची तालुक्याला अद्यापही युरिया खताचा पुरवठा करण्यात आलेला नाही, असे म्हणणे शेतकऱ्यांच्या पचनी पडणारे नाही. मागील वर्षी कोरची तालुक्यात दुष्काळ होता. दीड वर्षापासून कोरोना महामारीचे संकट आणि यावर्षी खोडकिडा, गादमाशी व करपा असे तिहेरी अस्मानी संकट शेतकऱ्यांना झेलावे लागत असतानाच आता युरियासाठी भटकंती शेतकऱ्यांना करावी लागत आहे. त्यामुळे साठेबाजी करणाऱ्या खत विक्रेत्यांची व डिलरची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
काेट
गडचिराेली जिल्ह्यात यावर्षी युरिया खत आवश्यक प्रमाणात उपलब्ध झाला नाही. येत्या दोन-तीन दिवसांत युरिया उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक प्रमाणातच युरियाचा वापर करावा, युरियाचा क्षमतेपेक्षा अधिक व अनावश्यक वापर करू नये.
विद्या मांडलिक,
तालुका कृषी अधिकारी कोरची