गडचिरोली : आगामी काही दिवसांत पावसाचे आगमन होणार असल्याने शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाकरिता बियाणे, खते खरेदी सुरूरु झाली आहे. निविष्ठा व गुणनियंत्रण कृषी आयुक्तालयाने रासायनिक खतांच्या कमी झालेल्या किमती प्रशासनाला व कृषी विभागाल्या कळविल्या आहेत. त्या सुधारित दरानेच शेतकऱ्यांनी खताची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
खतांच्या किमती कंपनीनिहाय आहेत. कंपन्यांनी जाहीर केलेल्या सुधारित किमतीपेक्षा अधिक दराने खते खरेदी करू नये. बोगस बियाणे, खतांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंग यांनी केले आहे.
काही कंपन्यांच्या खतांचे दर वेगळेवेगळे आहेत. खरीप हंगामामध्ये आवश्यक रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये खतांच्या दराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. खते खरेदी करताना आधार कार्ड क्रमांक व मोबाइल क्रमांक सांगून ऑनलाइन प्रणालीद्वारे पॉस मशीनवरच खते खरेदी करावी. जास्त दराने खताची विक्री होत असल्यास कृषी कार्यालयाशी संपर्क करावा, असे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी कळविले आहे.
(बॉक्स)
१५,८८० शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे मिळणार
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान सन २०२१-२२ या योजनेतून धान उत्पादक १५,८८० शेतकऱ्यांना ५०० रुपये प्रतिएकर प्रमाणे धान बियाणांसाठी तर २५० प्रतिएकर याप्रमाणे तूर पिकासाठी अनुदान मिळणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात १७८७ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केले आहेत. उर्वरित १४,०९३ शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज केलेला नसेल त्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन अथवा गावातील संबंधित कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधून बियाणे घटकाचा लाभ घ्यावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी कळविले.
(बॉक्स)
पक्क्या पावतीनेच बियाणे खरेदी करा
- कृषी विभागाकडून जिल्ह्यात १३ भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना दक्षता घेणे आवश्यक आहे. अधिकृत विक्रेत्यांकडून पक्क्या पावतीसह बियाणे खरेदी करावीत. पावतीवर बियाणांचा संपूर्ण तपशील, जसे पीक, वाण, संपूर्ण लॉट क्रमांक, बियाणे कंपनीचे नाव, अंतिम दिनांक, खरेदीदाराचे संपूर्ण नाव आदी बाबी तपासून घ्याव्यात. बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी.
- सीलबंद बियाणे पाकिटे खरेदी करावीत. खरेदी केलेल्या बियाणांचे पाकीट, मूळ पावती तसेच थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. बियाणे उगवण कमी झाल्यास पेरणी झाल्यापासून १० दिवसांचे आत तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कार्यालय येथील तक्रार निवारण कक्षात पावतीची झेरॉक्स जोडून लेखी स्वरूपात तक्रार करावी.