जिल्हा परिषदेत कार्यशाळा : पशुसंवर्धन व कुकुटपालनावरही मार्गदर्शनगडचिरोली : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात शुक्रवारी कार्यशाळा घेण्यात आली. पशुपालकांना कुकुटपालन व अन्य व्यवसायावर मार्गदर्शन करण्यात आले. व्यवसायातून आर्थिक भरभराट साधण्यासाठी शेतकऱ्यांनी पूरक व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती अजय कंकडलावार यांच्या हस्ते झाले. यावेळी नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दक्षिणकर, सहयोगी प्रा. डॉ. नितीन कुरकुरे, पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल गायकवाड, डॉ. डी. डी. घोरपडे, जि. प. सदस्य केसरी उसेंडी, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बुरले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आशा गेडाम, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. भदाडे, डॉ. रेवतकर उपस्थित होते. डॉ. दक्षिणकर यांनी कुकुटपालनाद्वारे प्रगती, बाजारपेठ, कुकुटपालन व्यवस्थापन यावर तर डॉ. कुरकुरे यांनी कोंबड्यांवरील रोग व उपाययोजना तसेच डॉ. गायकवाड यांनी कोंबड्यांच्या विविध जाती व संगोपनावर मार्गदर्शन केले. यावेळी १६२ कुकुटपालक उपस्थित होते. संचालन डॉ. बोरकर यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. मोहमद आरीफ, डॉ. गिरीश रामटेके, पशुधन विकास अधिकारी डॉ. शीतल ताराम, डॉ. जांभुळे, डॉ. उंदीरवाडे, डॉ. उसेंडी, डॉ. भगत, डॉ. भदाने, डॉ. मेश्राम, डॉ. रेहपाडे, डॉ. ठवरे, उईके, कमलेश बोबाटे, अतुल मेश्राम व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे
By admin | Published: May 25, 2016 1:50 AM