गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नदी व नाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण गावे जंगलाने व्यापली असल्याने शेतीसाठी अत्यंत कमी प्रमाणात शेतजमीन उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे एक ते दोन एकर शेती उपलब्ध आहे. त्यातही त्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. परिणामी या शेतीमध्ये हलक्या धानाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही पीक घेऊ शकत नाही. परिणामी शेतकरी वर्ग आता नदी, नाल्यांमध्ये शेती करण्याकडे वळत चालला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना एप्रिल, मे पर्यंत पाणी राहते. या कालावधीपर्यंत भाजीपाला किंवा इतर रबी पीक सहज निघू शकते. याचा अंदाज शेतकरी वर्गाला येत आहे. परिणामी वैनगंगा, कठाणी, पाल, सती, पर्लकोटा, गोदावरी, इंद्रावती आदी नद्यांच्या काठावर तसेच आतील भागात मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे. जवळच पाणी राहत असल्याने पाणी देण्याचा खर्चही अधिक आहे. चालू रबी हंगामात नदी काठावर सुमारे दोन हजार हेक्टवर विविध पिकांची लागवड करण्यात आली असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी नदी काठावरील व पात्रात शेती करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पिकांसाठी रासायनिक खते व कीटकनाशके टाकली जातात. त्यामुळे पाणी दूषित होत चालले आहे. (नगर प्रतिनिधी)
नदी काठावरच्या शेतीला शेतकऱ्यांची विशेष पसंती
By admin | Published: December 28, 2015 1:42 AM