लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : भारतीय किसान संघ विदर्भ प्रांताच्या वतीने सोमवारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अहेरी उपविभागातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.वनजमिनीचे पट्टे मिळण्यासाठी हजारो नागरिकांनी प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केले आहेत. या प्रस्तावामध्ये थोड्याफार त्रुट्या आहेत. मात्र या त्रुट्या लक्षात आणून देऊन त्या दूर करण्यासाठी सूचना दिल्या जात नाही. परिणामी हजारो प्रस्ताव तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयात पडून आहेत. त्रुट्या दूर करून वनपट्ट्यांचे वाटप करावे, शेतकऱ्यांना २४ तास अखंडित वीज पुरवठा करावा, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीची किंमत संबंधितांना देण्यात यावी, गडचिरोली जिल्ह्यातील तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना लाभ देण्यात यावा, शेताच्या कुंपनासाठी मोफत तार उपलब्ध करून द्यावा, रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शेतीतून उत्पादन घेणे अशक्य झाले आहे. रानडुकरांकडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले जाते. त्यामुळे रानडुकरांना मारण्याची परवानगी द्यावी. सर्व शेतमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट किंमत द्यावी, कृषीसाठी स्वतंत्र बजट सादर करावे, स्वतंत्र कृषी न्यायालय स्थापन करावे, शेतीवर आधारित लघु उद्योग तालुकापातळीवर सुरू करावे, गोवंश हत्यावर पूर्णपणे बंदी लावावी, शेतकरी गायी पाळतील, यादृष्टीने नियोजन करावे, आणेवारी पद्धतीचा फेर विचार करावा, आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.भारतीय किसान संघाच्या या मोर्चात अहेरी उपविभागातील अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड या तालुक्यातील जवळपास ५०० नागरिक सहभागी झाले होते. शहराच्या मुख्य मार्गाने मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत महामंत्री बाबुराव देशमुख, विदर्भ प्रांत संघटन मंत्री रमेश मंडाळे, अहेरी तालुकाध्यक्ष संजय यमसलवार, तालुकामंत्री सुधाकर मुलकरी, उपाध्यक्ष लालसू पुंगाटी, रवी कुळमेथे, मुलचेरा तालुका मंत्री हनमंतू वेलादी, मिलन बिश्वास, संतोष जोशी यांनी केले.शासनाच्या दृष्टीने येथील जनतेच्या विकासाच्या दृष्टीने या मागण्यांकडे शासनाने लक्ष घालावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांचा धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 1:13 AM
भारतीय किसान संघ विदर्भ प्रांताच्या वतीने सोमवारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अहेरी उपविभागातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
ठळक मुद्देभारतीय किसान संघाचे नेतृत्त्व : वनहक्क पट्ट्यांचे दावे तात्काळ मंजूर करा