डिझेल इंजीनने पिकाचे ओलीत : शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीरविसोरा : धानपीक निवसवण्याच्या मार्गावर असताना पावसाने कायमची दडी मारली आहे. त्यामुळे पाण्याअभावी धानपीक करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग मिळेल त्या साधनांचा व मिळेल तिथून पाणी आणून धानपीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. विसोरा-शंकरपूर परिसरात धानपिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी पावसाचे प्रमाण जिल्हाभरात कमी झाले. त्यामुळे तलाव, बोड्या पूर्णपणे भरल्या नाही. या तलाव, बोड्यांचे पाणी १५ दिवसांपूर्वीच आटले आहे. धानपीक निसवण्याच्या मार्गावर असताना धानपिकाला पाणी नाही. त्यामुळे धानपीक करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. हातात आलेले पीक करपण्याची शक्यता असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे स्वत:चे डिझेल इंजीन नाही. त्यामुळे भाडेतत्त्वावर डिझेल इंजीन घेऊन पाणी दिले जात आहे. काही शेतकऱ्यांचे शेत देसाईगंज-कुरखेडा मार्गाच्या एका बाजुला आहे. तर दुसऱ्या बाजुला पाणी उपलब्ध आहे. मध्यंतरी मुख्य मार्ग असल्याने पाईप टाकण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे मुख्य मार्गाच्या अर्ध्याभागापर्यंत पाईप आणून पाणी सोडले जात आहे. पाईपावरून वाहन जाऊ नये, यासाठी दोन्ही बाजुला बुजगावणे लावण्यात आले आहेत.
धानपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
By admin | Published: October 28, 2015 1:38 AM