खासगी रुग्णालयात गर्दी वाढली
आष्टी : मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे शहरातील काही खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. विशेष म्हणजे, काही रुग्ण मास्क लावत नसल्याचे चित्र आहे.
केरोसीनअभावी अडचण वाढली
अहेरी : केरोसीनचा पुरवठा करणे शासनाने आता बंद केले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. मात्र केरोसीन बंद झाल्याने अडचण जात आहे.
बेरोजगार युवकांना कर्ज देण्याची मागणी
आरमाेरी : तालुक्यात रोजगाराभिमुख उद्योगांचा अभाव आहे. बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येते. उद्योग नसल्याने युवकांमध्ये निराशा पसरत आहे. बँकांकडून कर्ज मिळत नाही. परिणामी, युवकांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
धोकादायक पुलाला कठडे लावा
गडचिराेली : जिल्ह्यात अनेक नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलांवर कठडे लावण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नाल्यांवर संरक्षण कठडे तुटले असून काही चोरीलाही गेले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देवून नव्याने कठडे बांधावे, अशी मागणी होत आहे.
अवैध वाहतुकीला निर्बंध घालावा
गडचिराेली : जिल्ह्यात अनेक मार्गांवर अवैध वाहतुकीला ऊत आला असून, याकडे मात्र परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अवैध प्रवाशी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना सतत घडत असून, यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. याकडे वाहतूक विभाग, तसेच परिवहन विभागाने लक्ष ठेवून अवैध वाहतुकीवर निर्बंध आणण्याची मागणी केली जात आहे.
जीवनावश्यक वस्तूचे दर गगनाला
आरमाेरी : सध्या जीवनावश्यक वस्तूसह इतर सर्वच वस्तूचे दर गगणाला भिडले आहे. खाद्य तेलाचे भाव तर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ७० ते ८० रुपयांना मिळणारे तेल पॉकेट आता १२० ते १४० रुपयांपर्यंत पोहाेचले आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट बिघडत आहे.
शासकीय कार्यालयांची स्वच्छता करावी
गडचिराेली : जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालयात अस्वच्छता आहे. काही माेजकेच कार्यालय सोडले तर इतर कार्यालयामध्ये अस्वच्छता बघायला मिळते. भिंतीवर व पायऱ्यांवर तंबाखू व गुटखा खाऊन थुंकल्याचे दिसून येते. या प्रक्रियेत जनतेसोबतच कार्यालयीन कर्मचाऱ्यांचाही सहभाग असतो. त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
प्रसाधनगृह नसल्याने महिलांची कुचंबना
चामाेर्शी : ग्रामीण भागातील काही प्रवाशी निवाऱ्याजवळ प्रसाधनगृह नसल्याने तसेच ज्या ठिकाणी आहे तिथे सर्वत्र अस्वच्छता असल्याने महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.
मोकळ्या जागेची स्वच्छता करा
देसाईगंज : शहरात अंतर्गत स्वच्छता अभियान राबविले जात आहे, असे असले तरी शहरातील अनेक मोकळ्या जागेत व प्लाॅटमध्ये कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. हा कचरा प्लाॅटधारकांच्या खासगी जागेत असल्याने स्वच्छता कर्मचारी तो साफ करत नाही. त्यामुळे या ठिकाणी आणखी कचरा फेकला जातो. यामुळे घाणीचे साम्राज्य तयार होऊन शहर सौंदर्य बाधित करत आहे.
सांडपाण्यामुळे आरोग्य बाधित
अहेरी : तालुक्यातील अनेक गावांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुडुंब भरल्या आहेत. त्यातून डासांची पैदास वाढली आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे घातक आहे. ग्रामपंचायतीने नाल्यांची सफाई करावी, सांडपाणी वाहून नेणारा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तालुका सीमा फलक नसल्याने संभ्रम
चामाेर्शी : जिल्ह्यातील एकाही तालुक्याच्या सीमेवर तालुका सीमा स्वागत फलक नाही. त्यामुळे कोणता तालुका कुठून सुरू होतो. याबाबत नवीन व्यक्ती संभ्रमात पडतो आहे. या सीमांवर सीमा स्वागत फलक लावल्यास सीमाही सुशोभित दिसेल. तसेच या माध्यमातून शहरांच्या अंतराची माहितीही मिळेल. त्यामुळे बांधकाम विभागाने प्रत्येक तालुका सीमेवर सीमा स्वागत फलक लावावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जिल्ह्यातील शिवभोजनाचे केंद्र वाढावे
गडचिराेली : शासनाने शिवभोजन केंद्र सुरू केली आहेत. मात्र, त्याच्यातील थाळींची संख्या मोजकीच ठेवली आहे. शिवाय केंद्रांची संख्या कमी आहे.
नळ योजनेच्या तांत्रिक अडचणी दूर करा
आलापल्ली : जिल्ह्यातील अनेक गावात नळयोजनेतंर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत. तांत्रिक अडचणी अजुनही दूर झाल्या नाही.
रोजगार हमीची कामे सुरू करावी
चामाेर्शी : परिसरात शेतमजुरांची संख्या बरीच आहे. मात्र, रोहयोची कामे सुरू करण्यात आली नाही. मागील वर्षी जिल्हा प्रशासनाने सिंचन व कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक कामे सुरू केली होती. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळाले. मात्र, यावर्षी जॉबकार्ड वाटप करूनही काम उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे कुटुंब कसे चालावे, हा प्रश्न मजुरांसमोर निर्माण झाला आहे.