देसाईगंज तालुका : विसोरा परिसरात स्वयंप्रेरणेने शेतकरी करताहेत प्रयोगशील शेतीविसोरा : देसाईगंज तालुक्यातील शेतकरी धान उत्पादक शेतकरी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. मात्र येथील अल्पभूधारक शेतकरी परंपरेने घेत असलेल्या धानपीक उत्पादनासाठी लागणारा मूळ खर्च उत्पन्नातून मिळणाऱ्या रकमेपेक्षा अधिक राहत असल्याने अनेक शेतकरी उद्योगी व प्रयोगशील शेतीकडे वळले आहेत. विसोरा परिसरात फूलशेती, मका, कारली, ऊस, भाजीपाला अशी विविध पिके परिसरातील शेतकरी घेत आहेत. धानपिकासाठी, शेतात नांगरणी, पेरणी, रोवणी, निंदण, कापणी, मळणी या सर्व कामांसाठी हजारो रुपये खर्च करूनही शेवटी पावसाच्या लहरीपणामुळे शेतातील धान (रास) घरी येण्याची शेवटपर्यंत खात्री नसते. जर ती रास घरी आलीच तर बाजारात धानाला हवा तसा भाव मिळत नाही. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी अन्य नगदी तसेच कमी खर्चात अधिक नफा मिळवून देणाऱ्या पिकांच्या लागवडीस प्राधान्य देताना दिसत आहेत. देसाईगंज तालुक्यातील विसोरा, एकलपूर, तुळशी व तालुक्यातील अन्य शेतकरी धानपिकाच्या नावाने शासनाला दोष न देता, शेती पीक लागवड पद्धतीत बदल करीत आहेत. यात कुठेही कृषी विभागाचे नाव समोर आले नाही. आर्थिक स्तर उंचावण्यासाठी बळीराजा स्वत: पुढाकार घेत असल्याची ही सुरुवात आहे. देसाईगंज तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील आमगाव, सावंगी तसेच गाढवी नदीकाठावरील एकलपूर हा पट्टा भाजीपाला पिकासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे आणखी एक खास बाब म्हणजे डोंगरगाव गावातील ४० टक्के शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे तालुक्यात भाजीपाल्यासह ऊस, फूलशेतीचे क्षेत्र वाढले आहे. यातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाहून अधिक नफा मिळत नसल्याने त्यांच्या आर्थिक दर्जात वाढ होत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.
नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला
By admin | Published: May 15, 2016 1:06 AM