लाकेमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध अडचणींना ताेंड द्यावे लागले. शिवाय पावसाचा अनियमितपणा व इतर कारणामुळे यावर्षी धान उत्पादनाचा उतारा घटला आहे. एकरामागे पाच ते सहा पाेते धानाचे उत्पादन कमी झाल्याचे मळणी झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. यावर्षी धानाचे उत्पादन घटल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. खरीप हंगामात यावर्षी धान पिकावर माेठ्या प्रमाणात मावा, तुडतुडा, खाेडकीडा आदी राेग व कीडीने आक्रमन केल्याने अनेक शेतकऱ्यांच्या ताेंडचा घास हिरावला. कीड राेगामुळेधानाचे प्रती हेक्टरी उत्पादनात बरीच घट झाली आहे. परिणामी काही शेतकऱ्यांचा लागवड खर्चसुद्धा भरून निघणे कठिण झाले आहे. आता वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमाेर निर्माण झाला आहे. यावर्षी चांगले उत्पादन हाेणार, अशी आशा शेतकऱ्यांना हाेती. मात्र धान पिकावर विविध प्रकारच्या राेगाने आक्रमण केल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे चांगली शेतजमीन व पाण्याची सुविधा आहे, अशा शेतजमिनीत एकरी १८ ते २० पाेते धानाचे उत्पादन हाेते. मात्र यावर्षी एकरी १३ ते १४ पाेते धानाचे उत्पादन हाती येत आहे. काही शेतकऱ्यांना तर यापेक्षाही कमी उत्पादन हाेत असल्याचे दिसून येते. मजुरांच्या मजुरीमध्ये माेठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे शेतीला लागणारा खर्च जास्त येत आहे. तर हाती येणारे उत्पादन त्यापेक्षा कमी हाेत आहे. जिल्ह्याच्या बऱ्याच भागात धान उत्पादनात यंदा घट आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी सेवा सहकारी साेसायटी व शासकीय तसेच खासगी बॅंकांकडून कर्ज काढले. आता उत्पादन कमी प्रमाणात झाल्याने कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे शासनाने यावर समाधानकारक ताेडगा काढावा. शेतकऱ्यांना पुरेशी आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अनेकजण पीक विमा लाभाच्या प्रतीक्षेतगडचिराेली जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज करून पीक विमा याेजनेत सहभाग घेतला. विविध प्रकारचे कीड, राेग व निसर्गाच्या अवकृपेमुळे उत्पादनावर परिणाम झाला. मात्र संबंधित विमा कंपनीकडून पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पीक विम्याची रक्कम मिळत नसेल तर पीक विमा काढायचाच कशाला, असा सवाल शेतकरी करीत आहेत.
उत्पादन कमी हाेण्याची कारणेयावर्षीच्या खरीप हंगामात पाऊस उशिरा बरसला. धानाचे वाफे टाकहूनही पाऊस न आल्याने राेवणीचा हंगाम लांबणीवर गेला. राेवणीचे काम उशिरा झाल्याने धान भरण्यास विलंब झाला. परिणामी कापणी, बांधणी व मळणीचा हंगाम लांबणीवर पडला. पावसाचा अनियमितपणा, उशिरा झालेली राेवणी, विविध राेगांचा प्रादुर्भाव तसेच धान भरून झाल्यावर कापणीच्यावेळेस अवकाळी पाऊस बरसला. या सर्व कारणांमुळे यंदा जड, हलके व मध्यम प्रतीच्या धानाचे उत्पादन घटले आहे.