ऑनलाईन लोकमतगडचिरोली : जनहितवादी समिती आणि ग्रामसभा संघ एटापल्लीच्या वतीने गेल्या ५ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले साखळी उपोषण अजूनही सुरूच आहे. दरम्यान माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि जि.प.सभापती भाग्यश्री आत्राम यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेत त्यांची विचारपूस केली.एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवरील लोहखनिज उत्खनन करताना कायदेशिर बाबींचे पालन होत नसल्यामुळे ती लिज रद्द करावी, या लिजमुळे ग्रामसभेच्या झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई द्यावी अशी उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. याशिवाय सदर कंपनीचा प्रस्तावित चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील लॉयड स्टिल कंपनीचा लोहप्रकल्प एटापल्ली तालुक्यात उभारून तिथे स्थानिक बेरोजगारांना नोकऱ्या द्याव्या, त्यांच्यासाठी तांत्रिक प्रशिक्षणाची व्यवस्था करावी, अशीही उपोषणकर्त्यांची मागणी आहे. मात्र त्यांच्या उपोषणाला ५० दिवस पूर्ण झाले तरी अजून प्रशासनाने दखल घेतलेली नाही. या मागण्यांबाबत निर्णय होईपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहील, असा निर्धार उपोषणकर्त्यांच्या वतीने सुरेश बारसागडे व दीक्षा झाडे यांनी व्यक्त केला. दरम्यान जिल्हा ग्रामसभा महासंघाचे देवाजी तोफा व इतर सहकारी पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठींबा दिल्याचे बारसागडे यांनी सांगितले.प्रश्न राज्य शासनाच्या अखत्यारीतीलसदर उपोषणकर्त्यांच्या मागण्या जिल्हा प्रशासनाच्या नाही तर राज्य शासनाच्या अखत्यारीतील आहेत. त्याबाबत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. याशिवाय त्यांनी न्यायालयातही जनहित याचिका टाकलेली आहे. त्यावरील निर्णय येईपर्यंत तरी उपोषणकर्त्यांनी वाट पाहून उपोषण मागे घ्यावे. यासाठी तीन-चार वेळा त्यांची समजूत काढली, मात्र उपोषणकर्ते ही बाब समजून घेण्यास तयार नाहीत, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
५० दिवसानंतरही उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:04 AM
जनहितवादी समिती आणि ग्रामसभा संघ एटापल्लीच्या वतीने गेल्या ५ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले साखळी उपोषण अजूनही सुरूच आहे.
ठळक मुद्देग्रामसभांची नुकसानभरपाई द्या : धर्मरावबाबा आत्राम यांची भेट