दिलीप दहेलकर, गडचिराेली : घरात चिमुकल्या बाळाचे आगमण झाले की, कुटूंबियांच्या आनंदाला पारावार उरत नाही. दरम्यान सर्वाना चाहुल लागते, ती म्हणजे चिमुकल्याच्या नामकरण साेहळयाची. ताे दिवस कधी येताे, याची कुटूंबियांसह सर्वांनाच माेठी उत्कंठा लागलेली असते. नामकरणाची तारीख ठरली. पत्रिकाऐवजी प्रत्यक्ष भेटून नामकरण कार्यक्रमाचे नातेवाईकांना आमंत्रण देणे सुरू झाले. दरम्यान एक दिवसांवर आलेल्या नामकरण कार्यक्रमाचे नातेवाईकांना निमंत्रण देवून दुचाकीने स्वताच्या गावाला परतताना काळाने पित्यावर झडप घातली. अन् कार्यक्रम हाेण्यापुर्वीच ‘त्या’ चिमुकलीला पित्याच्या प्रेमाला पाेरके व्हावे लागले. ही हृदयद्रावक घटना घडली, २९ मार्च राेजी सायंकाळी ४ वाजताच्या सूमारास धानाेरा तालुक्यातील येरकड टी पाईंटवर.
देवनाथ मोतीराम काटेंगे (३२) रा. अर्जुनी तालुका धानोरा असे अपघातात ठार झालेल्या पित्याचे नाव आहे.
देवनाथ काटेंगे यांना तीन अपत्य आहेत. पहिला मुलगा, दुसरी मुलगी आणि सर्वात लहान दीड महिन्याची चिमुकली मुलगी. सदर लहान मुलीचा १ मार्च रोजी नामकरण विधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान वडील देवनाथ काटेंगे हे गावापासून जवळच असलेल्या आपल्या मामाच्या गावी सिंदेसुर येथे दुचाकीने नामकरण कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेले. एम. एच. ४९ एल - ६९५८ या क्रमांकाच्या दुचाकीने नातेवाईकाचे गाव गाठले. दरम्यान नातेवाईकांनी जेवण करून जाण्याचा आग्रह केला परंतु उद्या मुलीचे नामकरण असल्याने सामानाची जुळवाजुळव आणि तयारी करायची आहे, त्यामुळे मला लवकर जाणे आवश्यक आहे, असे सांगून देवनाथ गावी परत जाण्यासाठी निघाला. नियतीने त्याच्या नशिबात काय लिहुल ठेवले याची मुळीच त्याला कल्पना नव्हती.
धानाेरा - मुरूमगाव मार्गावरून येताना येरकड टी पॉईंट जवळ मुरूमगावकडून छत्तीसगड येथून गडचिराेलीकडे निलगिरीच्या लाकडाची वाहतुक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक बसली. धडकेने दुचाकी स्वार काेसळला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. आनंदाचे क्षण क्षणात दुखात बदलून गेले.
पित्याचा मृतदेह पाहून त्याची लहान मुले, पत्नीने एकच हंबरडा फोडला. घरचा कर्ता पुरुष काळाच्या पडदयाआड गेल्याने पत्नीच्या अंगावर कुटूंबाची जबाबदारी येवून पडली. धानोराच्या ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
गावकऱ्यांमध्येही हळहळ
उद्या मुलीच्या नामकरणाकरिता येणाऱ्या नातेवाईकांना अंत्यविधीला यावे लागणार आहे. निमंत्रण पाेहाेचले नामकरण साेहळयाचे मात्र अपघाती निधनाने काटेंगे यांच्या घरी अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की ओढवली. गावकऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त हाेत आहे.