अन्न विभागातही दोन पदे रिक्त आहेत. पण नियमित भेटीतून ते आपला कोटा पूर्ण करत आहेत. या विभागात सहायक आयुक्त पदाची जबाबदारी नागपूरचे सहायक आयुक्त अभय देशपांडे यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे नागपूरसह भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीचा प्रभार आहे. तरीही आठवड्यातून दोन दिवस गडचिरोलीत देऊन त्यांनी बरीच कामे मार्गी लावली आहेत. याशिवाय या विभागात दोनपैकी एक अन्न निरीक्षक पूर्णवेळ असल्यामुळे तपासणी आणि नमुने घेण्याची कामे नियमित सुरू आहेत.
हॉटेल्सची तपासणी होते, मेडिकल वाऱ्यावर
जिल्ह्यात ६७० परवानाधारक हॉटेल आणि ५८६९ नोंदणीधारक आहेत. नियमानुसार त्यांची तपासणी करून नमुनेेही घेतले जातात. ते नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. याशिवाय दूध, तेल, मिरची-मसाले, सुगंधित तंबाखू यांच्या तपासणीसाठी विशेष मोहिमाही होतात. पण औषधी दुकानांच्या तपासणीकडे मात्र दुर्लक्ष आहे.
मंजूर पदे १३, त्यातील ७ रिक्त
अन्न व औषध प्रशासन विभागात राज्यभरातच पदे रिक्त असली तरी गडचिरोली जिल्ह्यात हे प्रमाण जास्तच गंभीर आहे. या कार्यालयात एकूण १३ पदे मंजूर आहेत. पण त्यापैकी ६ भरलेली असून ७ पदे रिक्त आहेत. याचा परिणाम कामकाजावर होतो. तरीही महिन्याकाठी अन्न विभागाकडून १५ ठिकाणी तपासणी करून ८ नमुने घेतले जातात.
११० प्रकरणे न्यायप्रविष्ट
जिल्ह्यात झालेल्या कारवाई संदर्भात अन्न विभागाची ११० प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. पोलीस आणि या विभागाच्या समन्वयातून ही प्रकरणे दाखल होतात. या प्रकरणांच्या तारखांवरही विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक तालुक्यात जावे लागते. याशिवाय परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठीही वेळ द्यावा लागतो. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज आहे.
गडचिरोलीसह सर्वच जिल्ह्यांमध्ये रिक्त पदे आहेत. तरीही गडचिरोलीकडे विशेष लक्ष देण्याचा आमचा प्रयत्न असतो. शासनाने दिलेले तपासणी आणि नमुन्यांचे लक्ष्य नेहमीच पूर्ण केले जाते. तरीही मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे कामावर थोडाफार तरी परिणाम होतो.
- अभय देशपांडे
सहायक आयुक्त, अन्न प्रशासन