आॅनलाईन लोकमतवैरागड : कुरखेडा तालुक्याच्या शिरपूर, भगवानपूर, देऊळगाव, वाढोणा, सावलखेडा या गावातील ग्रामसभांनी एफडीसीएमच्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी १३ मार्चपासून जंगलातच उपोषण करण्याचा इशारा दिला. याबाबत सोमवारी शिरपूर येथील श्रीराम मंदिरात झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी वृक्षतोडीला विरोध केला. या विरोधापुढे एफडीसीएमने माघार घेतली. पुढील निर्णयापर्यंत वृक्षतोड बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या विषयाबाबत आमदार कृष्णा गजबे यांनी सदर बैठकीत मध्यस्थी केली.शिरपूर, भगवानूपर, वाढोणा येथील नागरिकांनी एकत्र येऊन एफडीसीएम मार्फत होणारी वृक्षतोड थांबविली. तसेच तीन ट्रॅक्टरही जप्त केले. त्यानंतर एफडीसीएमच्या अधिकाºयांना बोलविण्यात आले. मात्र ते आले नाही. आ. कृष्णा गजबे यांनी बैठक घेऊन सदर विषयावर मध्यस्थी केली. या बैठकीला एफडीसीएमचे विभागीय व्यवस्थापक एम. डी. राजपुते, वडसाचे उपविभागीय पोलीस अधिकारी काळे, कुरखेडाचे ठाणेदार पडळकर आदी उपस्थित होते. शिरपूर, भगवानपूर, वाढोणा येथील ग्रामसभा व ग्रामस्थांची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत येत्या आठ दिवसात बैठक होणार आहे. जोपर्यंत एफडीसीएमच्या वृक्षतोडीच्या मुद्यावर तोडगा निघत नाही. तोपर्यंत एफडीसीएमतर्फे वृक्षतोड होणार नाही. तसेच लाकडाचे वाहतुकही करण्यात येणार नाही, असा निर्णय आमदार कृष्णा गजबे यांच्या मध्यस्थीने सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, भगवानपूर, वाढोणा, सावलखेडा हे गाव पेसा अंतर्गत येतात. येथे ग्रामसभेची कोणतीही परवानगी न घेता एफडीसीएमने या गावांच्या हद्दित येणारे जंगल पूर्णपणे नष्ट केले. वनहक्कानुसार वने, वन्यप्राणी, जैवविविधता यांना हानी पोहोचणारी कृती राज्य व केंद्र सरकारच्या यंत्रणेला करता येत नसतानाही एफडीसीएमने मनमानी करीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली. तेथील गौणवनोपज देखील नष्ट केले. येथील स्थानिकांचा रोजगार हिरावून घेतल्याने ‘एफडीसीएम हटाव, जंगल बचाव’ असा नारा देत सोमवारी पाच गावातील नागरिक मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित झाले होते. एफडीसीएमकडून होणारी वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी आहे.
गावकऱ्यांच्या विरोधापुढे अखेर एफडीसीएमची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:04 AM
कुरखेडा तालुक्याच्या शिरपूर, भगवानपूर, देऊळगाव, वाढोणा, सावलखेडा या गावातील ग्रामसभांनी एफडीसीएमच्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी १३ मार्चपासून जंगलातच उपोषण करण्याचा इशारा दिला.
ठळक मुद्देआमदारांची मध्यस्थी : वनमंत्री घेणार ग्रामसभेची बैठक