लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : तालुक्यातील पाेर्ला वनपरिक्षेत्रात सर्वाधिक वाघांचा वावर आहे. तालुक्यातील बहुतांश शेती जंगलाला लागून असल्याने पावसाळ्यात शेती कसणाऱ्यांना वाघांपासून धाेका हाेण्याची शक्यता आहे. मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी पाेर्ला वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातर्फे क्षेत्रातील ग्रामपंचायतींना पत्र पाठवून नागरिकांनी जंगलात जाऊ नये यासाठी दवंडीद्वारे सूचित करण्यास सांगितले आहे. तरीसुद्धा वनालगत शेती कसणारे शेतकरी जंगलाच्या परिसरातूनच जाणार आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना सर्वाधिक धाेका आहे.गडचिराेली जिल्ह्यातील जंगलात जवळपास ३० वर्षांपूर्वी वाघांचा वावर हाेता. यामध्ये प्रामुख्याने देसाईगंज, कुरखेडा, गडचिराेली, धानाेरा आदी तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर जिल्ह्यातील जंगलात वाघ स्थायी हाेत नव्हते. हिवाळा व उन्हाळ्यात वास्तव्य केल्यानंतर पावसाळ्यापूर्वी पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यात स्थलांतरित व्हायचे, परंतु गेल्या तीन वर्षांत वाघांचा वावर वाढला व ते स्थायी झाले. वडसा वनविभाग व गडचिराेली वनविभागातील धानाेरा तालुक्यातील चातगाव वनपरिक्षेत्रात वाघांचा वावर आहे. याशिवाय अहेरी, एटापल्ली तालुक्यातही वाघांचे दर्शन अनेकांना झाले आहे, परंतु गडचिराेली तालुक्यात वाघांची दहशत माेठ्या प्रमाणावर आहे. ६ नाेव्हेंबर २०२० राेजी वाघाच्या हल्ल्यात राजगाटा चक येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही पहिली घटना हाेती. तर १८ मे राेजी दिभना येथील महिलेला वाघाने ठार केले, ही शेवटची घटना घडली. पहिल्या हल्ल्यानंतर या वनक्षेत्रात वाघांचे मानवावरील हल्ले वाढतच राहिले. आतापर्यंत ८ महिन्याच्या कालावधीत गडचिराेली तालुक्यातील सहा महिला व २ पुरुषांचा मृत्यू वाघांच्या हल्ल्यात झाला आहे. यामध्ये राजगाटा चक, इंदिरानगर, गाेगाव, धुंडेशिवणी, अडपल्ली, महादवाडी, कुऱ्हाडी व राजगाटा माल येथील महिला व पुरुषांचा समावेश आहे. तर दिभना व कुऱ्हाडी येथील पुरुष व कळमटाेला चक येथील एक महिला वाघाच्या हल्ल्यापासून बचावल्या. त्यांना वाघाने केवळ जखमी केले. पाेर्ला वनपरिक्षेत्रातील जंगल जवळपास १५ ते २० किमी चारही दिशांनी व्याप्त आहे. याशिवाय जंगलात वन्यप्राणी बऱ्याच प्रमाणात आहेत. डाेंगरदऱ्या व लहान ओढे असल्याने पाणी व त्यांना शिकार करता येईल, अशी भाैगाेलिक स्थिती आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्रात वाघ स्थिरावले आहेत. तालुक्यातील बहुतांश गावातील शेती जंगलालगत आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामात शेती कसण्याकरिता जाणार आहेत. अशास्थितीत त्यांना वाघांपासून धाेका हाेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, अस्वलींसह बिबट्यांचाही वावर पाेर्ला वनपरिक्षेत्रात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग्रामपंचायतींना पाठविले पत्रपाेर्ला वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या वतीने पाेर्ला, चुरचुरा, सिर्सी, मरेगाव आदी क्षेत्रसहायक कार्यालयांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींना पत्र पाठवून नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी दवंडी देण्यास सूचित केले आहे. विशेष म्हणजे, चुरचुरा, महादवाडी, कुऱ्हाडी, अडपल्ली, गाेगाव, दिभना, राजगाटा, कळमटाेला, आंबेटाेला, आंबेशिवणी, देशपूर, कुरंझा, देलाेडा, धुंडेशिवणी मरेगाव, टेंभा, चांभार्डा, बाेथेडा, मुरमबाेडी आदी गावे जंगलाला लागून आहेत. सदर गावांच्या परिसरात वाघांचा वावर आहे. यापैकी पाेर्ला वनपरिक्षेत्रातील ग्रामपंचायतींना पत्र पाठविण्यात आले आहे.