नवेगावात कार्यक्रम : संघमित्रा खोब्रागडे, कुणाल उंदीरवाडे यांचा गौरव गडचिरोली : तथागत बुद्ध, फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सम्यक विहार न्यासच्या वतीने नवेगावात शनिवारी आयोजित बुद्ध महोत्सवात स्पर्धा परीक्षेतील यशस्वीतांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून बारसिंगे, प्रा. बांबोळे, माधवराव मेश्राम, मिनाक्षी खोब्रागडे, सत्कारमूर्ती संघमित्रा खोब्रागडे, कुणाल उंदीरवाडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात धम्ममित्र पाटील यांनी बुद्ध पूजेने केली. त्यानंतर बुद्धगीत सादर करून पुष्पगुच्छाने मान्यवरांचा स्वागत करण्यात आले. प्रा. बांबोळे यांनी प्रास्ताविकातून सत्कारमूर्तीच्या स्वागताचे औचित्य विशद केले. माधवराव मेश्राम यांनी शौचालयास आवश्यक १ हजार ५०० चौ.फूट जागा विहारास दान दिली. तसेच संघमित्रा खोब्रागडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुयश प्राप्त केले. कुणाल उंदीरवाडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत सुयश प्राप्त करीत उपमुख्य कार्यकारी अधिकारीपद मिळविले, असेही सांगितले. यशस्वीतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. धम्म हा चर्चेसाठी नसून अनुसरणासाठी आहे. शीलास अधिक महत्त्व द्यावे, असे प्रतिपादन माधवराव मेश्राम यांनी केले. तर संघमित्रा खोब्रागडे यांनी उपस्थितांना यशस्वीतेचा मूलमंत्र सांगितला. महोत्सवाचे संचालन नरेश बांबोळे तर आभार विद्या बांबोळे यांनी मानले. यावेळी बहुसंख्य बौद्ध बांधव हजर होते. (शहर प्रतिनिधी)
बुद्ध महोत्सवात यशस्वीतांचा सत्कार
By admin | Published: May 22, 2016 1:08 AM