शाळा बेमुदत बंद करू : उपोषणकर्त्या संतप्त विद्यार्थ्यांचा इशाराघोट : चामोर्शी पंचायत समितीअंतर्गत घोट येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गेल्या तीन वर्षांपासून इयत्ता ११ वी व १२ वीसाठी भौतिकशास्त्र विषयाचे शिक्षक नाहीत. तसेच इयत्ता ६ वी ते १० वीसाठी दोन शिक्षकांची व एका पर्यवेक्षकाची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सदर मुद्यावर शाळेतील विद्यार्थी आक्रमक झाले असून जि. प. प्रशासनाने तत्काळ या शाळेत शिक्षकांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी सोमवारपासून शाळेसमोरच उपोषण सुरू करण्यात आले आहे.या उपोषणाला शाळानायक, शाळा उपनायक, सांस्कृतिक प्रमुख, क्रिडानायक आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत. घोट येथील जि. प. शाळेमध्ये इयत्ता ११ वी, १२ वीच्या विज्ञान शाखेची सुविधा आहे. परिसरातील खासगी व्यवस्थापनाच्या इतर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात प्रचंड शुल्क घेतल्या जात असल्याने गरीब विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे विज्ञान शाखेचे उच्च माध्यमिक शिक्षण घेत आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून येथे भौतिकशास्त्र विषयाचे कनिष्ठ प्राध्यापक नाहीत. त्यामुळे प्रात्यक्षिकासह थेअरी अध्यापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हायस्कूल विभागात दोन शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.यासंदर्भात जि. प. प्रशासनाकडे अनेकदा निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र शिक्षक देण्याबाबत कार्यवाही झाली नाही. जि. प. च्या शिक्षण विभागाने तत्काळ या शाळेत तीन शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा घोट जिल्हा परिषद शाळा बेमुदत बंद पाडू, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे शाळेसमोर उपोषण
By admin | Published: September 13, 2016 1:00 AM