योगीता पिपरे यांचे प्रतिपादन : गडचिरोली नगराध्यक्षाचा पदभार स्वीकारला गडचिरोली : येत्या काही दिवसातच नगरसेवक, सामान्य जनता, नगर परिषदेचे अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून प्रत्येक वार्डात जनसंवाद कार्यक्रम घेऊन कोणत्या वार्डात कोणत्या समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी किती निधीची गरज आहे. याचे सुक्ष्म नियोजन केले जाईल. त्यानुसार केंद्र व राज्य शासनाकडे निधीची मागणी करून गडचिरोली शहराचा विकास केला जाईल. जनतेने आपल्यावर टाकलेला विश्वासाचे ऋण शहर विकासाच्या माध्यमातून फेडले जाईल, असे आश्वासन नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी दिले. योगीता पिपरे यांनी गडचिरोली नगराध्यक्ष पदाचा पदभार गुरूवारी स्वीकारला. यावेळी त्या बोलत होत्या. पद ग्रहण समारंभाला खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा निपाने, सुधाकर येनगंधलवार, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे यांच्यासह भाजपाचे संपूर्ण नगरसेवक, काँग्रेसचे नगरसेवक सतिश विधाते, अपक्ष नगसेवक प्रशांत खोब्रागडे, माधुरी खोब्रागडे, रमेश चौधरी उपस्थित होते. या कार्यक्रमाला शेकडो भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना नागरिकांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. जनतेने भाजपच्या हाती एकहाती सत्ता दिली आहे. त्यामुळे निर्णय घेताना अडचण जाणार नाही. मात्र सर्व निर्णय घेताना इतर नगरसेवकांनाही विश्वासात घेतले जाईल. निवडणुकीदरम्यान केंद्र शासनाकडून शहर विकासासाठी निधी आणू, असे आश्वासन आपल्याकडून देण्यात आले होते. केंद्राकडून गडचिरोली शहराला निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी दिले.
विश्वासाचे ऋण शहर विकासाने फेडू
By admin | Published: December 30, 2016 1:53 AM