चामोर्शीतील शेतकऱ्यांचे नुकसान : अनेक घरांमध्ये शिरले पाणीलोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी चामोर्शी येथील दोन तलावांच्या पाळी फुटल्या. त्यामुळे या तलावाखाली असलेले शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. अनेकांचे धानाचे पऱ्हे व रोवणे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चामोर्शी-मूल मार्गावर असलेल्या साधुबाबा नगराला लागून असलेल्या नागोल तलावाची पाळ बुधवारी फुटली. या तलावातील पाण्याचा लोंढा चामोर्शी शहरात असलेल्या तलावात येण्यास सुरुवात झाली. या तलावाच्या मागे वस्ती आहे. अतिरिक्त पाण्यामुळे गावातीलही तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. सदर तलाव फुटल्यास मार्र्कंडापुरा वस्तीला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे चामोर्शी शहरातील काही नागरिकांनी शहरातील तलावाची सांडव्यानजीक पाळ फोडली. यामुळे गाव तलावाच्या खाली असलेली हजारो हेक्टर शेतजमीन पुन्हा पाण्याखाली आली. दोन्ही तलाव फुटल्याने शेतीसह चामोर्शी शहरातील घरांनाही धोका निर्माण झाला होता. अनेक नागरिकांच्या घरातही पाणी शिरले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर चामोर्शीचे तहसीलदार अरूण येरचे, पोलीस निरीक्षक किरण अवचर, मुख्याधिकारी आर्शिया जुही यांनी नुकसानीची पाहणी केली. तलाव फुटल्याने शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आहे. तलावाच्या खालील भागात धानाची शेती आहे. या शेतीसाठी बांध्या तयार करण्यात आल्या होत्या. मात्र तलावाच्या पाण्यामुळे बांध्या पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या. प्रशासनाच्या मार्फतीने पंचनामे सुरू आहेत.
फुटलेल्या तलावाचे पाणी शेकडो हेक्टरवरील शेतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:26 AM