एल्गार : राम नेवले यांचे प्रतिपादनगडचिरोली : विदर्भ राज्य झाल्याशिवाय विकासाची कल्पना करणे अशक्य आहे. त्यामुळे विदर्भ राज्य निर्मितीसाठी संघर्ष केला पाहिजे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे पदाधिकारी राम नेवले यांनी केले.स्थानिक शिवाजी महाविद्यालयात विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीच्यावतीने सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी नामदेवराव गडपल्लीवार तर प्रमुख अतिथी म्हणून समितीचे मुख्य निमंत्रक दीपक निलावार, अरूण केदार, अरूण मुनघाटे, अॅड. संजय ठाकरे, डॉ. रमेश गजबे, रमेश भुरसे, पांडूरंग भांडेकर, समय्या पसूला, प्राचार्य खुशाल वाघरे, राजेंद्रसिंग ठाकूर, रोहिदास राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करतांना नेवले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्याची मागणी पूर्ण होऊ शकते, त्यासाठी संघटनात्मक बांधणी करून तीव्र आंदोलन छेडण्याची गरज आहे. विदर्भवासियांनी संघटीत होऊन वेगळ्या विदर्भाची मागणी केली पाहिजे. विदर्भ राज्य झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणे शक्य नाही. विदर्भातील साधनसंपत्ती लुटून पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यामध्ये संघटनात्मक बांधणी करायची असून जिल्ह्यातील दोघा जणांचा कोर कमिटीमध्ये समावेश राहणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागपूर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन निमंत्रक अरूण मुनघाटे यांनी केले. आभार रमेश भुरसे यांनी मानले. यशस्वीतेसाठी विदर्भ राज्य आंदोलन शाखा गडचिरोलीच्या सदस्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
विदर्भ राज्यासाठी संघर्ष करा
By admin | Published: June 12, 2014 12:06 AM