लोककला लुप्त :मातीत खपणाऱ्या माणसाचा निखळ आनंद हिरावलावैरागड : हिरव्याकंच झाडीतून जन्माला आली म्हणून ती झाडीपट्टीची रंगभूमी. गोंधळ, तमाशा, दंडार या लोककला प्रकारातून ही रंगभूमी जन्माला आली आणि पुढे ती बहरली. लोककलेचा इथल्या माणसात दीर्घकाळ प्रभाव राहिला. आता आधुनिकीकरण व नागरिकरणाच्या प्रभावाने दंडार या लोककला प्रकारावर अवकळा आली आहे. परिणामी दंडारीतून मातीत खपणाऱ्या माणसाला मिळणारा निखळ आनंद आता हिरावला आहे. पूर्वी गावात श्रीगणेश, दुर्गाेत्सव असले की, हमखास दंडारीचा प्रयोग असायचा. रात्रभर दंडारीचा प्रयोग आणि पहाटेला कलावंत मंडळी आणि त्यांचे सहकारी मूर्ती विसर्जनात ढोलकीच्या तालावर नाचत मोठ्या उत्साहात गणरायाला निरोप देत होते. आजच्यासारखा त्यावेळी ग्लॅमर नव्हता. डीजेचा कानठळ्या बसविणारा आवाजही त्यावेळी नव्हता. बहुतेक दंडारीच्या प्रयोगात संपूर्ण पुरूष कलावंत असायचे. त्यातील स्त्री पात्र ही पुरूषच साकारत होता. हुबेहुब तत्काल, सुंगधा वनवास, झेलावती वनवास, राजा हरीश्चंद्र अशा पौराणिक कथानकांवर दंडारीचा प्रयोग होत असत. दंडारीच्या कथानकात रसिक प्रेक्षक इतका एकरूप होत असे की, श्रीरामाची भूमिका करणाऱ्या व्यक्तींचा प्रभाव समाजातील बऱ्याच दिवसापर्यंत ओसरत नसे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या धानपट्ट्यातील जिल्ह्यात लोककलेचा अधिक प्रभाव आहे. गोंदिया जिल्ह्यातील रेंगेवारच्या दंडारीने राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी आपल्या अभियनाची चुणूक दाखविली. आजपासून ४० ते ५० वर्षापूर्वीचा काळ म्हणजे दंडार या लोककला प्रकाराचा उमेदीचा काळ होता. पण त्यानंतर मनोरंजनाची विविध साधणे आलीत आणि गोंधळ, तमाशा, दंडार आदी लोककलेचे प्रकार मागे पडले.स्वत:ची पदरमोड करून लोककला प्रकाराला प्रोत्साहन देणारा रसिक जिल्ह्यात आहे खरा, पण लोककला सादर करणारे कलावंता मात्र आता कमी झाले आहेत. गावात दंडारीचा प्रयोग म्हणजे आनंदाची पर्वणी. मात्र आता हा रसिकतेचा साज हरविला आहे. आजची रंगभूमी पूर्ण व्यावसायिक झाली आहे. निखळ आनंद देणाऱ्या या लोककला प्रकारांना अवकळा आली आहे. अशातही झाडीपट्टीचा अनमोल ठेवा जपणारे प्रेक्षक कलावंत हा ठेवा आपल्या उराशी जपून ठेवला आहे. (वार्ताहर)
ंझाडीपट्टीतील दंडार शेवटच्या प्रवेशात
By admin | Published: October 30, 2015 1:39 AM