गडचिराेली : तेलंगणा सरकारच्या वतीने सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या मेडीगड्डा बॅरेजमध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी मोबदला मिळावा, यासाठी सिरोंचा तहसील कार्याालयासमोर साखळी उपोषण सुरू केले होते. ४३ दिवसांपासून आंदोलन सुरूच होते. राज्य सरकारने यासाठी ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बुधवारी आंदोलन मागे घेण्यात आले.
तेलंगणा सरकाने गोदावरी नदीवर पाच वर्षांपूर्वी बॅरेज बांधले आहे. या बॅरेजमध्ये सिरोंचा तालुक्यातील १२ गावांमधील शेतकऱ्यांची १२८ हेक्टर जमीन गेली आहे. मात्र याचा मोबदला देण्यात आला नाही. तेलंगणा सरकार जर नुकसान देणार नसेल तर महाराष्ट्र शासन याचा मोबदला देईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिले होते. मात्र अनेक दिवस होऊनही मोबदला मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यापासून आंदोलन सुरू केले होते. पैसे देण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे, असे सांगीतले जात होते. मात्र जोपर्यंत मोबदला मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता.
या आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ११ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. उर्वरित २६ कोटी रुपये लवकरच दिले जाणार आहेत. माजी मंत्री तथा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनी सिरोंचा येथे जाऊन आंदोलकांना लिंबू पाणी पाजले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या इतरही अडचणी जाणून घेतल्या, त्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन शोभाताई फडणवीस यांनी दिले.