वाशिम जिल्हा रूगणालयात नेमणूक : नवजात बालकाचे मृत्यू प्रकरण भोवले नगर प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयाचे प्रसुतीतज्ज्ञ डॉ. प्रविण किलनाके यांनी हेतुपुरस्सर गर्भवती महिलेच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले. वेळेत सिजर न केल्याने शमीम सुलतान अब्दुल शगीर शेख हिच्या बालकाचा गर्भाशयातच मृत्यू झाला. याबाबतची तक्रार मुस्लीम वेल्फेअर सोसायटीच्या सदस्यांनी राज्याच्या आरोग्य विभागाकडे केल्यानंतर आरोग्य विभागाने चौकशी केली. चौकशीमध्ये डॉ. किलनाके हे दोषी आढळून आल्याने आरोग्य विभागाने त्यांच्यावर शुक्रवारी निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांना वाशिम जिल्हा रूग्णालयात नेमणूक देण्यात आली आहे. अहेरी येथील गर्भवती महिला शमीम सुलतान अब्दुल शगीर शेख हिला २२ डिसेंबर रोजी अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयातून गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. शमीमची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्या कुटुंबियांनी डॉ. किलनाके यांना भेटून सिजर करण्याची विनंती केली. मात्र डॉ. किलनाके यांनी २५ डिसेंबरपर्यंत सदर गर्भवती महिलेकडे दुर्लक्ष केले. डॉ. किलनाके यांनी रक्ताची गरज असल्याचे सांगितल्यावर सदर महिलेच्या पतीने स्वत: रक्तदान करून रक्त उपलब्ध करून दिले. मात्र डॉ. किलनाके यांनी सदर गर्भवती महिलेला रक्त पुरविले नाही. प्रसुती वेदनेने किंचाळत असलेल्या शमीम शेख हिची सिजर करून प्रसुती केली नाही. त्यामुळे शमीम शेख यांचे बाळ दगावले. डॉ. किलनाके यांच्या या प्रकाराबाबत मुस्लीम वेल्फेअर कमिटीने तीव्र संताप व्यक्त केला. डॉ. किलनाके यांच्यावर कारवाई करावी याबाबतची तक्रार दाखल केली. त्यानुसार शासनाने चौकशी समिती नेमली होती. या समितीने डॉ. किलनाके यांची चौकशी केली असता, त्यामध्ये डॉ. किलनाके दोषी आढळून आले. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने त्यांना निलंबित करीत असल्याचा आदेश काढला. डॉ. किलनाके यांना निलंबित केल्याचे आदेश धडकताच आरोग्य विभागात एकच खळबळ माजली. पाच महिने सातत्याने पाठपुरावा शमीम शेख यांचे बाळ २५ डिसेंबर रोजी दगावले. तेव्हापासून मुस्लीम वेल्फेअर सोसायटीच्या सदस्यांनी डॉ. किलनाके यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्याचा सातत्याने पाच महिने पाठपुरावा केला. त्यामुळे आरोग्य विभागाने चौकशी समिती बसविली व दोषी असलेल्या किलनाके यांच्या निलंबनाची कारवाई केली, अशी माहिती मुस्लीम वेल्फेअर सोसायटीच्या सदस्यांनी दिली आहे.
अखेर प्रवीण किलनाके निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2017 1:14 AM