लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : इटियाडोह पाटबंधारे विभाग व पाणी वापर संस्थांनी आरमोरी, अरसोडा व पालोरा येथील शेतकऱ्यांना उन्हाळी धान पिकाला पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पंधरा दिवस लोटूनही इटियाडोह पाटबंधारे विभागाने पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांचे धान पीक धोक्यात आले हाेते. शेतकऱ्यांनी आंदाेलन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाटबंधारे विभागाने पाणी साेडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांतील हरितक्रांतीचे स्वप्न साकारणारा इटियाडोह प्रकल्प आहे. इटियाडोह विभागाने यावर्षी शेतकऱ्यांना इटियाडोह धरणाचे पाणी सोडणार आहे, असे सांगून या विभागाने पाणी वसुली करून घेतली. त्यामुळे आरमोरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली; परंतु ऐनवेळी मागील पंधरा दिवसांपासून इटियाडोह पाटबंधारे विभागाने पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांच्या हाती येणारे उभे धान पीक करपण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांनी इटियाडोह पाटबंधारे विभागाला वारंवार पाणी सोडण्याची विनंती करून पाणी द्यावे किंवा नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे व इटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यात न आल्यास चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिलीप घोडाम, माजी जि. प. सदस्य अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात दिला होता. याची दखल घेत इटियाडोह प्रकल्पात प्रशासनाने पाणी साेडले आहे.
३०० हेक्टरला लाभ - उन्हाळी धान पिकासाठी पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आरमाेरी, पालोरा व अरसोडा येथील शेतकऱ्यांनी जवळपास ३०० हेक्टरवर धान पिकाची लागवड केली आहे. मात्र, पाणी मिळत नसल्याने धान पीक करपण्यास सुरुवात झाली हाेती. शेतकऱ्यांनी आंदाेलन करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने पाणी साेडले आहे. यामुळे धान पिकाला संजीवनी मिळाली आहे.