मूलचेरा : मूलचेरा तालुका मुख्यालयातील पानठेले व दुकानांची पोलीस, मुक्तीपथ, ग्रामपंचायतने संयुक्तरीत्या तपासणी केली. दरम्यान ११ जणांकडून तंबाखूजन्य पदार्थ व दोन खर्रा घोटण्याच्या मशीन जप्त करीत ७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मूलचेरा शहरात खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरु असल्याची माहिती मिळताच पोलीस, मुक्तीपथ व ग्रामपंचायतने पानठेले व दुकानांची तपासणी केली. दरम्यान ११ जणांकडून २ मशीन, खर्रा, ईगल पाकीट, बिडी, तंबाखू असा एकूण जवळपास २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस व ग्रामपंचायतने ७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
दरम्यान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलीस पाटलांच्या उपस्थितीत संपूर्ण तंबाखूजन्य पदार्थांची होळी करण्यात आली. तसेच गावात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध लावण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी उपस्थित पोलीस पाटलांना केले आहे. ही कारवाई मूलचेराचे ठाणेदार प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय विनायक सपाटे, पोलीस शिपाई कैलास राठोड, मुक्तीपथ तालुका संघटक रुपेश अंबादे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केली.
फाेटाे - तंबाखूजन्य पदार्थाची हाेळी करताना नागरिक.