खाकी वर्दीतील संवेदनशीलता : पालेकसातील तलांडी कुटुंबाला हातभारलोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी तालुक्यातील दामरंचा पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या पालेकसा येथील बिर्रा मुल्ला तलांडी यांच्या घराला २१ मे रोजी अचानक आग लागली. या आगीत बिर्रा यांचे घर व दैनंदिन वापराचे साहित्य जळून खाक झाले. ऐनवेळेवर आलेल्या संकटामुळे बिर्रा कुटुंब पूर्णपणे हादरून गेले होते. ही बाब दामरंचा उपपोलीस स्टेशनच्या पोलिसांना माहित होताच त्यांनी मदत गोळा करून सदर मदत बिर्रा यांना पोहोचवून दिली. यामुळे बिर्रा कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.मोठ्या कष्टाने उभारलेले घर व खरेदी केलेल्या वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने काही क्षणात जळून बेचिराख होते. हे सर्व पाहताना परक्या व्यक्तीचे मन हेलावून जाते. सदर संकट ज्या कुटुंबावर कोसळते, त्या कुटुंबाच्या दु:खाला परिसीमा राहत नाही. पालेकसा येथील बिर्रा तलांडी यांच्या घराला आग लागली. त्यांच्या मालकीच्या सुमारे ४५ शेळ्या आगीत जळून खाक झाल्या. शेळीपालन हा एकमेव व्यवसाय तलांडी कुटुंबाचा होता. मात्र भांडवलच गेल्याने उत्पन्न कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. शेळ्यांबरोबरच घर जळून खाक झाले. घरातील जीवनोपयोगी वस्तू, कपडेही आगीत कोळसा झाले. बिर्रा, त्यांची पत्नी, दोन मुले व बिर्राचे आई-वडील यांच्या समोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ही घटना जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना माहित झाली. त्यांच्या मार्गदर्शनात दामरंचा उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरिक्षक विलास मोरे, पोलीस उपनिरिक्षक अनिल लवटे, अभिजित भोसले, नागनाथ पाटील, गणेश मोरे व अन्य कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदत गोळा करण्यास सुरूवात केली. गोळा झालेल्या रकमेतून संसार उपयोगी साहित्य, भांडी, कुटुंबातील सर्व सदस्यांना कपडे, किराणा सामान खरेदी करून दिले. या सर्व साहित्यामुळे बिर्रा तलांडी यांचे मनोबल वाढण्यास मदत झाली आहे.यापूर्वीही केली मदतयापूर्वीही दामरंचा पोलिसांनी नैनगुडम येथील वसंता शेगम नामक व्यक्तीला मदत केली होती. त्यांच्या या कार्याचे नागरिकांनी कौतुक केले आहे. सर्वसामान्य व्यक्तींच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आलेले पोलीस अडचणीच्या वेळी मदतही करीत असल्याचे दिसून येत आहे.
‘त्या’ आगग्रस्त कुटुंबाला पोलिसांच्या मदतीने दिलासा
By admin | Published: June 02, 2017 12:59 AM