१०० मीटर अंतरावर वीटभट्टी लावली : धूरामुळे नागरिक त्रस्त, डोळ्यांना चूरचूर आणि श्वसनाचा त्रासलोकमत न्यूज नेटवर्कतळोधी मो. : चामोर्शी तालुक्यातील तळोधी येथील वॉर्ड क्रमांक-४ चा भाग रामपुरी टोली म्हणून ओळखला जातो. या वॉर्डाला लागूनच विटाभट्टी लावण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या वादळामुळे पेटत्या विटाभट्टीतील राख नागरिकांच्या घरामध्ये उडाली. या राखेमुळे नागरिकांचे हाल झाले. सदर राखेने गावाला आग लागण्याचा धोका निर्माण झाला होता. विटाभट्टी तेथून हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. रामपुरी टोली येथे २५ घरांची वस्ती आहे. विटाभट्टीमधून धूर बाहेर निघत असल्याने नागरिकांना डोळ्यांना चूरचूर व श्वसनाचा त्रास होत असल्याने विटाभट्टी गावापासून किमान एक किमी अंतरावर लावणे आवश्यक आहे. मात्र विटाभट्टी मालक बंडू डोंगरे यांनी विटाभट्टी घरांपासून अगदी १०० मिटर अंतरावर लावली आहे. विटाभट्टीचा धूर गावामध्ये पसरत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. रविवारी सायंकाळच्या सुमारास प्रचंड प्रमाणात वादळ झाले. या वादळामुळे विटाभट्टीची राख गावामध्ये उडाली. राख तप्त राहत असल्याने गावालाच आग लागण्याचा धोका निर्माण झाला होता. विटाभट्टीमुळे गावाला धोका असल्याने विटाभट्टी गावापासून काही दूर लावण्याची विनंती केली. मात्र विटाभट्टी मालकाने आपल्याकडे विटाभट्टी लावण्याची परवानगी आहे. जे करायचे आहे ते करा असे उत्तर दिले असल्याची माहिती नागरिकांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलतांना दिली आहे. विटाभट्टी मालकाने प्रमाणापेक्षा अधिकचे खोदकाम केले आहे. याकडेही महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.गावाजवळे विटाभट्टी लावण्यास महसूल विभागाने कशी काय परवानगी दिली असा प्रश्न उपस्थित होत आहे. या परिसरात गजानन दासलवार, बाळू लिंगोनवार, सिताबाई दुमाळे, दशरथ गेडाम, आनंदराव देवगिरीकर, बाबूराव दसलवार, बोट्या भोयर, विलास पुण्यप्रडीवार, देवाजी गेडाम, दामोधर तलवारकर, प्रभाकर गेडाम, मनोहर मॅकलवार, साहेब खान पठाण, परशुराम गेडाम, रामदास टिंगुसले, श्रिरंग शेरकी, मंजुळाबाई टिंगुसले, सुनिल लिंगोजवार, प्रदीप श्रीकोंडावार, अंबादास गेडाम यांची घरे आहेत. पुढील धोका टाळण्यासाठी तहसीलदारांनी मोका चौकशी करून या ठिकाणी विटाभट्टी लावण्यास मनाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या संदर्भात प्रशासन काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.मोकाचौकशी न करताच दिली परवानगीविटाभट्टी लावण्यासाठी महसूल व खनिकर्म विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. विटाभट्टीला परवानगी देण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे. विटाभट्टीमध्ये कोंडा टाकला जातो. व त्याला आग लावली जाते. यामधून निघणाऱ्या धुराचा त्रास नागरिकांना होतो . धुरामुळे श्वसन व डोळ्यांना आजार होण्याचाही धोका असतो. त्यामुळे गावापासून किमान एक किमी अंतरावर विटाभट्टी लावण्याला परवानगीच दिली जात नाही. बंडू डोंगरे यांची विटाभट्टी गावापासून अगदी १०० मिटर अंतरावर आहे. तरीही या विटाभट्टीला महसूल विभागाने परवानगी दिली आहे. यावरून संबंधित अधिकाऱ्यांनी मोका चौकशी न करताच परवानगी दिली असल्याचे स्पष्ट होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गावाजवळच्या विटाभट्टीमुळे रामपुरीटोलीला आगीचा धोका
By admin | Published: May 30, 2017 12:42 AM