आरमोरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, सद्य:स्थितीत लोकांना फिरण्यासाठी शहरात एकही लहानमोठे उद्यान नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आरमोरी व परिसरातील नागरिकांना फिरण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी आरमोरीचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी पी.आर. तांबटकर यांच्या कार्यकाळात आरमोरी देसाईगंज रोडवरील जागेत जैवविविधता उद्यान उभारण्यात आले होते. तांबटकर यांच्या काळात या उद्यानाची अनेक कामे जलदगतीने मार्गी लागली. मात्र, ते सेवानिवृत्त झाले आणि त्यांच्याबरोबर उद्यानाचे कामही थांबले होते. त्यानंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी उद्यानाचे रखडलेले काम सुरू करण्यासंदर्भात फारसे लक्ष दिले नाही.
दुर्लक्षित व रखडलेल्या अवस्थेतील उद्यानाला धूलिवंदनाच्या दिवशी आग लावून त्याची राखरांगोळी करण्यात आली. मात्र, उद्यानाला आग लावणा-या अज्ञात इसमाचा शोध वनविभागाला अद्यापही घेता आला नाही.
प्रत्येक तालुकास्तरावर जैवविविधता उद्यान व्हावे, हे शासनाचे धोरण आहे. त्यानुसारच, आरमोरी येथे जैवविविधता उद्यान उभारण्यात आले होते. आरमोरी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे व नगर परिषदेचे ठिकाण आहे. शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. मात्र, येथील नागरिकांना काही क्षण निवांतपणे घालविण्यासाठी, फिरण्यासाठी, मनोरंजनासाठी शहरात कुठलेही उद्यान किंवा बगिचा नाही. त्यामुळे आरमोरीकरांची मोठी घुसमट होत आहे. आरमोरी शहराजवळ एक तरी वनोद्यान व्हावे, ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या धोरणानुसार तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी तांबटकर यांच्या काळात जैवविविधता उद्यानाचे रूप साकारण्यास सुरुवात झाली होती. आरमोरी येथे जागेची पाहणी करून जैवविविधता उद्यान उभे करण्यासाठी उद्यानाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून निधीची मागणीही करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात वडसा रोडवरील जागेत जैवविविधता उद्यान उभारण्यास सुरुवात झाली. वनोद्यानात बांबूची झाडे, विविध प्रकारची फुले, फळे व दुर्मीळ वनौषधींची झाडे, विविध जातीची मौल्यवान झाडे व बगिचाही तयार करण्यात आला होता. मात्र, तांबटकर सेवानिवृत्त झाल्यावर उद्यानाचे काम रखडले होते. त्यानंतर आलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जैव विविधता उद्यानाचे रखडलेले उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी फारसे लक्ष दिले नाही.
उद्यान तर जाळले. शासनाचे खर्च झालेले लाखो रुपयेही पाण्यात गेले, शिवाय आरमोरीकरांचे उद्यानाचे स्वप्नही भंगले. त्यामुळे जळालेल्या जैवविविधता उद्यानाची आता नव्याने उभारणी होणार काय आणि त्यासाठी वनविभाग, जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी आरमोरीकरांचे जैवविविधता वनोद्यानाचे नव्याने स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.