लोकमत न्यूज नेटवर्कसावंगी : देसाईगंज तालुक्यात २० ग्राम पंचायतींपैकी १६ ग्राम पंचायतचा निवडणूक कार्यक्र म घोषित करण्यात आला, मात्र सावंगी ग्राम पंचायतचे विभाजन करु न सावंगी व गांधीनगर ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्र म घोषित झाला नाही. याबाबत ‘लोकमत’ने रविवारी बातमी प्रकाशित करताच दोन्ही ग्राम पंचायतच्या प्रभागांची तातडीने पुनर्रचना करु न देसाईगंज तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात सावंगी ग्राम पंचायतला नामाप्र (महिला) तर पुनर्वसित गांधीनगर गावच्या पहिल्या सरपंचपदाचा मान अनुसुचित जातीच्या महिला प्रवर्गाला मिळणार असल्याचे जाहीर झाले.सावंगी ग्राम पंचायतअंतर्गत असलेल्या पुनर्वसित गांधीनगरच्या गावकऱ्यांनी गांधीनगर गावाला स्वतंत्र ग्राम पंचायतचा दर्जा द्यावा अशी मागणी गावकरी अनेक वर्षांपासून करीत होते. परंतु जिल्हा प्रशासनासह महाराष्ट्र शासनाने दुर्लक्ष केले होते. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत गांधीनगरच्या नागरिकांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचे अस्त्र उपसल्यानंतर निवडणूक प्रशासन हादरले होते. दरम्यान गांधीनगर गावाला स्वतंत्र ग्राम पंचायतचा दर्जा देण्याबाबतची मागणी शासन दरबारी प्रलंबीत असल्याची बाब स्थानिक प्रशासनाने महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली. विधानसभा निवडणुकीत गांधीनगर मध्ये १२०० मतदानापैकी केवळ १७२ एवढेच मतदान झाले होते. अखेर शासनाला गांधीनगरच्या नागरिकांच्या मागणीपुढे झुकावे लागले.सावंगी व गांधीनगर या स्वतंत्र ग्राम पंचायतींची आरक्षण सोडत निघून प्रभागांची पुनर्रचना झाली असली तरी निवडणूक कार्यक्र म गुलदस्त्यातच आहे. आता सार्वत्रिक निवडणूक लवकरात लवकर घोषित करावी अशी मागणी जोर धरत आहे. निवडणूक कार्यक्र म पुढे दिला जाईल, असे तहसीलदार टी.जी. सोनवाने यांनी सांगितले.