आरमोरी : स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाची मान्सूनपूर्व तयारी मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने फोल ठरविली आहे. शहरातील निम्म्यापेक्षा अधिक वार्डातील नाल्यांची साफसफाई करण्यात न आल्याने अनेक वार्डातील नाल्या तुंबलेल्या स्थितीत आढळून आले. त्यामुळे अनेक तास पाणी रस्त्यावर जमा झाले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीची मान्सूनपूर्व तयारी शून्य असल्याचे निदर्शनास आले आहे.शहरातील नेहरू चौक, टिळक चौक, भगतसिंग चौक, मार्केट लाईन, सराफा लाईन, गजानन मंदिर, विठ्ठल मंदिर, ताडूरवारनगर, शक्तीनगर, गायकवाड चौक, बर्डी आदी वार्डातील निम्म्यापेक्षा अधिक नाल्यांची सफाई उन्हाळ्यात करण्यात आली नाही. शिवाय काही वार्डातील नाल्यांचा उपसा मागील २ वर्षापासून करण्यात आला नाही, असे वार्डातील नागरिकांचे म्हणणे आहे. शारदा कॉलनीतील रहिवाशांनी वार्डातील नाल्यांचा उपसा करण्याकरिता वारंवार ग्रामपंचायतकडे तक्रार व निवेदन दिले होते. परंतु ग्रामपंचायतने नागरिकांच्या मागणीकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले. नागरिकांनी केलेल्या एकाही तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे शारदा कॉलनीतील काही नागरिकांनी घराशेजारील नालींचा उपसा करण्याचे काम स्वत:च हाती घेतले. शहरातील काही वार्डातील नाल्यांमधील साफसफाई वर्षातून एकदाही करण्यात येत नाही. यामुळे नाल्यांमधील सांडपाणी पावसाळ्यात रस्त्यावरून वाहत असते. याचा सर्वाधिक त्रास नागरिकांनाच सहन करावा लागतो. शहरात बांधण्यात आलेल्या नाल्या सांडपाणी वाहून नेण्याकरिता असल्या तरी काही नागरिकांनी नाल्यांवर अतिक्रमण केले आहे तर काही नागरिक घरातील व दुकानातील केरकचरा नालीत आणून टाकतात असे चित्र असतांनाही नाल्यांवरील अतिक्रमणधारकांवर ग्रामपंचायत प्रशासन कुठलीही कारवाई करीत नाही. शिवाय दुकानातील केरकचरा नालीत टाकणाऱ्या नागरिकांवर पायबंदही घालत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतचे पदाधिकारी वार्डाच्या विकासाकडे लक्ष देण्यापेक्षा केवळ मतांचे राजकारण करण्यात व्यस्त आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे मार्केटलाईन, पंचायत समिती व काही वार्डातील नाल्यांमधील पाणी पूर्णत: रस्त्यावर आले होते. त्यामुळे रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते. जोरदार पाऊस झाल्यास शहरातील पाणी झोपड्यांमध्ये पाणी शिरून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात झालेल्या जोरदार पाऊसामुळे अनेक वार्डात रस्ते पाण्याने फुलून गेले होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. ग्रामपंचायतमार्फत मान्सूनपूर्व तयारी केली जाते. मात्र आरमोरी ग्रामपंचायतीने शहरातील निम्म्यापेक्षा जास्त वार्डातील नाल्यांचा उपसाच उन्हाळ्यात न केल्याने तसेच नाल्यांवरील अतिक्रमण न हटविल्याने शहरात जलमय स्थिती निर्माण झाली होती. (प्रतिनिधी)
पहिल्याच पावसात आरमोरीतील नाली चोख
By admin | Published: June 19, 2014 12:05 AM