नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागडमधील लोह खनिजाच्या अवैध विक्रीसंदर्भात आधी राज्य सरकारकडे तक्रार करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी चंद्रपूर येथील प्रकृती फाऊंडेशनला दिले व फाऊंडेशनची यासंदर्भातील जनहित याचिका निकाली काढली.
प्रकृती फाऊंडेशनने यासंदर्भात आधी राज्य सरकारकडे तक्रार न करता थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे न्यायालयाने हे निर्देश दिले. तसेच, राज्य सरकारने समाधानकारक कारवाई न केल्यास नवीन याचिका दाखल करण्याची त्यांना मुभा दिली. २००७ मध्ये लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी कंपनीला लोह खनिज खाणीकरिता सूरजागड येथील ३७४ हेक्टर जमीन २० वर्षांच्या लीजवर देण्यात आली आहे. यासंदर्भातील करारानुसार, कंपनीला पुरासालगोंदी (ता. एटापल्ली) येथे लोह प्रकल्प सुरू करून तेथे सूरजागडमधील लोह खनिज वापरायचे आहे.
तसेच अतिरिक्त लोह खनिज विदर्भातील उद्योगांना विकण्याची कंपनीला परवानगी आहे. कंपनीने पुरासालगोंदी किंवा अन्य ठिकाणी अद्याप लोह प्रकल्प सुरू केला नाही. परंतु, खाणीमधून लोह खनिजाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात आहे व हे लोह खनिज अवैधपणे आंध्र प्रदेश व तेलंगणा येथे विकले जात आहे. करिता, या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. महेश धात्रक यांनी कामकाज पाहिले.