अनेक घरांची पत्रे उडाली : विद्युत खांब कोसळून तारा तुटल्या; झाड कोसळून एक बैल ठारअहेरी : मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. दरम्यान शनिवारी सायंकाळच्या सुमारास आकाशात ढग जमून जोरदार वादळी पाऊस अहेरी तालुक्यात बरसला. या पावसामुळे अहेरीसह अनेक गावातील घरांची पत्रे उडाली. विद्युत खांब कोसळून तारा तुटल्या. तालुक्यातील चिंचगुंडी येथे अंकलू रामय्या गोलेटी यांच्या मालकीचा बैल झाड कोसळल्याने ठार झाला. तसेच वादळी पावसाने अनेकांचे नुकसान झाले. शनिवारी सायंकाळच्या सुमारास अहेरी, भुजंगरावपेठा, व्यंकटरावपेइा, इंदाराम देवलमरी, नागेपल्ली व लगतच्या इतर गावांमध्ये वादळी पाऊस बरसला. त्यापूर्वीच शुक्रवारीही सायंकाळच्या सुमारास वादळी पावसाने झोडपले. मात्र शनिवारचा पाऊस जोरदार होता. अहेरीत अनेकांच्या घरावरील कवेलु, सिमेंट व टिनचे पत्रे उडाली. भुजंगरावपेठा या गावात वादळी पावसामुळे कवेलु, टिनपत्रे उडाल्याने नुकसान झाले. अहेरी येथील राजू दूर्गासिंग मंथनवार यांच्या घरावरील सिमेंट पत्रे उडाली. पावसात घरातील धान्य, कपडे व इतर वस्तू भिजून अंदाजे ३० हजाराचे नुकसान झाले. भुजंगरावपेठा येथील शंकर गाटले यांचेही २५ हजाराची नुकसान झाले. वादळी पावसामुळे तालुक्यातील अनेक गावातील विद्युत खांब कोसळले. काही ठिकाणी तारा तुटल्या. यामुळे बहुतांश गावातील विद्युत पुरवठा गेल्या दोन दिवसापासून खंडीत झाला आहे.काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष मेहबूब अली, बबू शेख व इमरान खान यांनी अहेरी व भुजंगरावपेठा येथे जाऊन नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. या घरांचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी तहसीलदाराकडे मेहबूब अली यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
पहिल्या वादळी पावसाचा कहर
By admin | Published: June 15, 2014 11:31 PM