नगर पालिका क्षेत्रात होणार काम : प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविलेगडचिरोली : शहरातील व ग्रामीण भागातील दलित वस्तींच्या सुधारणांसाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यात येत होता. मात्र यावेळी नगर पालिका क्षेत्रातील दलितेतर वस्त्यांच्या सुधारणांसाठीही स्वतंत्र निधी उपलब्ध होणार आहे. यातून शहरातील दलित लोकसंख्या नसलेल्या भागातही रस्ते, नाल्या, समाज मंदिर याचे बांधकाम करण्यासाठी या निधीचा उपयोग करता येणार आहे. त्यामुळे शहराच्या सर्वांगिण विकासाला न्याय मिळण्यास मदत होणार आहे.गडचिरोली नगर पालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच पालिकेला अशा पद्धतीचा निधी उपलब्ध होईल, अशी माहिती मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी दिली आहे. अडीच कोटी रूपयापर्यंतचा प्रस्ताव या योजनेंतर्गत टाकण्यात आला आहे. किती निधी उपलब्ध होतो, हे आता लवकरच कळेल. याशिवाय चंद्रपूर मार्गावरील आठवडी बाजाराचे रूपही पालटविले जाणार आहे. या ठिकाणी व्यावसायिकांना गाळे उपलब्ध करून दिले जाणार असून मच्छी व मटन मार्केटसाठीही बांधकाम केले जाणार आहे. याचा निधीही लवकरच पालिकेला उपलब्ध होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)९ महिन्यांपासून डीपीडीसी रखडलीमागील ९ महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीची बैठक झालेली नाही. त्यामुळे नगर पालिका, नगर पंचायती यांना निधी वितरित करण्याबाबत सर्व कामकाज ठप्प झालेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नगर पंचायत क्षेत्रात विकासकामांवर परिणाम होत आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक ही राज्याच्या अर्थसंकल्पापूर्वी घेतली जाते. या बैठकीतील जिल्ह्याचा नियोजन आराखडा मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठविला जातो ; मात्र गडचिरोली जिल्ह्यात ही बैठक झालीच नाही. जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी नियोजन समितीची बैठक घ्यावी म्हणून २० सदस्यांनी मागणीही केली होती.आता जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या. आता तरी पालकमंत्र्यांनी तत्काळ नियोजन समितीची बैठक घ्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
दलितेतर भागासाठी यंदा पहिल्यांदाच मिळणार निधी
By admin | Published: March 21, 2017 12:49 AM