पुरुषोत्तम भागडकरलाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी माल वाहतुकीसह प्रवासी वाहतुकीसाठी सुरू केलेल्या वडसा रेल्वे स्थानकावर ११८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला दीर्घ ब्रेक लागला आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून प्रवाशाविना सुनसान झालेल्या वडसा रेल्वे स्थानकावरून पुन्हा प्रवासी वाहतूक कधी सुरू होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पूर्वीच्या चांदा (चंद्रपूर) जिल्ह्यातील आणि आता गडचिरोली जिल्ह्याचा भाग असलेल्या वडसा (देसाईगंज) स्थानकावरून धावणारी गोंदिया-चांदाफोर्ट (आता बल्लारशा) ही पॅसेंजर रेल्वे गाडी गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी बंद झाली. यामुळे गेल्या दीड वर्षांपासून अनेक सामान्य प्रवाशांची अडचण होत आहे. या स्थानकावरून भाजीपाला, धान्य, कापड मार्केटसाठी जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. जिल्ह्यातील हे एकमेव रेल्वेस्थानक असल्यामुळे गोंदिया-चंद्रपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची या स्थानकावर नेहमीच गर्दी राहात होती. मात्र, सध्या या रेल्वेस्थानकावर प्रवाशांविना शुकशुकाट दिसत आहे.जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक असलेल्या या रेल्वे स्थानकावरून आजपर्यंतच्या इतिहासात कधीही प्रवासी रेल्वेची वाहतूक थांबली नाही. केवळ कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, वडसा स्थानकावरून धावणारी प्रवासी रेल्वे थांबली. सध्या या रेल्वेमार्गाने सुपरफास्ट एक्स्प्रेस आठवड्यातून काही दिवस चालतात. मात्र, त्यांचा थांबा गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्टेशन असूनही वडसा स्थानकावर नाही. याशिवाय काही मालवाहू गाड्या सुरू आहेत.
मुंबईची लोकल सुरू, स्थानिक पॅसेंजर का नाही?सध्या महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत कोरोनाची लाट आटोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. आठवड्यातील रविवार हा एक दिवस सोडता बाकी सर्व दिवशी सर्वच प्रतिष्ठाने रीतसर परवानगीने सुरू आहेत. त्यामुळे वडसासारख्या बाजारपेठेस व्यापारी दृष्टिकोनातून दळणवळणाच्या साधनांची अत्यंत गरज भासते. नागपूर, मुंबई या ठिकाणी लोकल गाड्यांमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर बल्लारशहा ते गोंदिया या मार्गावरही पॅसेंजर गाडी सुरू करावी, अशी मागणी गडचिरोली जिल्हावासीयांकडून केली जात आहे.
असा झाला चांदाफाेर्ट रेल्वे मार्गाचा विस्तार
गडचिरोली जिल्ह्याला केवळ १८.४८ कि.मी.लांबीचा लोहमार्ग लाभला आहे. इंग्रजांनी १९०८ मध्ये वडसा (देसाईगंज) वरून जाणारी गोंदिया ते नागभिड ही नॅरोगेज रेल्वेसेवा सुरू केली. त्यानंतर १९१३ मध्ये गोंदिया-चांदाफोर्ट ही नॅरोगेज रेल्वेसेवा सुरू झाली. १९९२ मध्ये गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमार्गाचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये झाले. तत्कालीन चांदा (चंद्रपूर) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सी. सी. देसाई यांचेही देसाईगंज (वडसा) येथे रेल्वे आणण्यात महत्त्वाचे योगदान होते.