घोट येथील घटना : महिलेचा शारीरिक व मानसिक छळ
गडचिरोली : पैशासाठी महिलेचा छळ करणार्या पतीसह इतर चार जणांवर चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद नामदेव कागदेलवार (पती), नामदेव कागदेलवार (सासरा), पुष्पा कागदेलवार (सासू),अनुराधा देऊलवार (नणद), राजू देऊलवार (नंदई) सर्व रा. घोट ता. चामोर्शी अशी आरोपींची नावे आहेत. शितल हिचे विनोद कागदेलवार रा. घोट यांच्याशी लग्न झाले. लग्नात हुंडा म्हणून शितलच्या वडीलांनी दीड लाख रूपये, तीन तोळे सोने, २० ग्रॅमचे नेकलेस, २० ग्रॅमची सोन्याची गोप, १० ग्रॅम सोन्याची अंगठी, टॉप्स व बसखर्च म्हणून २५ हजार रूपये नगदी दिले. लग्नानंतर शितल व विनोद दोघेही घोट येथे राहू लागले. विनोद हा जिल्हा मध्यवर्ती बँक गडचिरोली येथे लिपिक पदावर कार्यरत असल्याने ते घोट येथूनच ये-जा करीत होते. नणंदेचा नवरा राजू देऊलवार हे व्याहाड येथील शाळेत शिक्षक आहेत. नणद व तिचा नवरा दोघेही आठवड्यातून तीन ते चार दिवस घोट येथेच राहत होते. विनोद सायंकाळी घरी आल्यानंतर त्याला खोट्या गोष्टी सांगून भडकविण्यात येत होते. त्यामुळे विनोद दारू पिऊन शितलला नेहमी मारहाण करीत होता. घरच्या त्रासाला कंटाळून दोघेही गडचिरोली येथे राहण्यास आले. गडचिरोली येथे आल्यानंतरही शितलच्या चारित्र्यावर संशय घेऊन विनोदने तिला मारहाण सुरू केली. विनादने सासू, सासरे, नणद व नंदई यांना गडचिरोली येथे बोलाविले. विनोदला साथ देऊन या सर्वांनी शितल सोबत भांडण सुरू केले. एवढेच नाही तर विनोद व नणदेचा नवरा राजू देऊलवार यांनी मारहाण केली. त्यानंतर गरोदर असतांनाच शितल ही वडीलाकडे मुल येथे राहण्यास गेली. मुलगा झाल्यानंतर विनोद हा काही दिवसापूर्वी मुल येथे गेला. त्याने घर बांधण्यासाठी ७ लाख रूपयाची मागणी केली. १० महिन्याचा मुलगा होऊनही शितलला घरी नेले नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या शितलने २१ मे रोजी चामोर्शी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी विनोद कागदेलवार, नामदेव कागदेलवार, पुष्पा कागदेलवार, अनुराधा देऊलवार, राजू देऊलवार यांच्या विरोधात भादवि ४९८ (अ), ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चामोर्शीचे ठाणेदार संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनात चामोर्शी पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)