आलापल्ली : रानडुकराची शिकार करून त्याचे मांस शिजविल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अहेरी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पथकाने केली.
महागाव बुज येथील बानय्या बुचय्या जंगीडवार यांच्या घरी डुकराचे मांस आणून शिजविले जात असल्याची गाेपनीय माहिती वन विभागाच्या पथकाला प्राप्त झाली. बानय्याच्या घरी जाऊन चाैकशी केली असता, हे मांस महागाव बुज येथीलच सतीश माेंडी दिगुटलावार, मल्लेश नारायण पानेम यांनी आणून दिल्याचे सांगितले. मल्लेश व सतीशची चाैकशी केली असता, हे मांस महागाव खुर्द येथील दादाराव वसंत सिडाम व वनेश भान्ना पंदराम यांनी आणून दिल्याचे सांगितले. दादाराव व वनेश या दाेघांच्या घरी जाऊन चाैकशी केली असता, त्यांनी जंगली डुकराची शिकार केल्याचे कबूल केले. तसेच त्यांच्या घरी प्राण्यांना पकडण्यासाठी वापरण्यात येणारे फासे, सुरा, कुऱ्हाड व दाेन किलाे मांस आढळून आले. त्यांच्यावर वन गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. ही कारवाई अहेरीचे वन परिक्षेत्राधिकारी सी. वाय. ताेंबर्लावार, खमनचेरूचे क्षेत्र सहायक एस. एम. पडालवार, डी. एस. गजबे, एस. एम. धात्रक, बी. जी. काेसनकर, बी. एस. हलामी, व्ही. बी. आत्राम, पी. एम. नंदगिरवार, एच. जी. कुमरे, ए. जे. उप्पल आदींनी केली.
फाेटाे - अटक करण्यात आलेल्या आराेपीसह वन विभागाचे कर्मचारी.