प्रवाशांची गैरसोय : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : दुर्गम भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याचबरोबर काही पूल जीर्ण झाले असल्याने ते कधीही कोसळण्याचा धोका असल्याने एसटी विभागाने जिल्ह्यातील पाच बसफेऱ्या बंद केल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील ५० टक्के बसेस ग्रामीण व दुर्गम भागातील प्रवाशांची वाहतूक करतात. जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची अनेक वर्ष दुरूस्तीच केली जात नाही. परिणामी डांबर व गिट्टी उखडून त्यावरून बस नेणे अशक्य होते. तर काही जिल्हा निर्मितीच्या पूर्वीचे आहेत. त्यांच्याही डागडुजीकडे दुर्लक्ष झाल्याने सदर पूल जीर्ण झाले आहेत. तर काही पुलांच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम आटोपणे आवश्यक होते. मात्र पुलाचे काम झाले नसल्याने बस वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. खराब झालेले रस्ते, जीर्ण पूल तर काही ठिकाणी सुरू असलेले पुलाचे बांधकाम यामुळे लांब पल्ल्याच्या पाच बसफेऱ्या बंद झाल्या आहेत. यामध्ये सिरोंचा-झिंगानूर, सिरोंचा-पातागुडम, अंकिसा-आसरअल्ली, अहेरी-कालीनगर, जारावंडी-एटापल्ली या बसफेऱ्यांचा समावेश आहे. अंकिसा-आसरअल्ली मार्ग चांगला असला तरी या दोन गावांदरम्यान पुलाचे बांधकाम सुरू आहे. बाजूने मार्ग तयार करण्यात आला असला तरी तो पाहिजे तेवढा सक्षम नसल्याने सिरोंचावरून बस फक्त अंकिसापर्यंत नेली जाते. त्यानंतर सदर बस वापस येते. कालीनगर-अहेरी मार्गावरीवरून वसमतपूर गावाजवळचा पूल जीर्ण झाला आहे. जारावंडी-कसनसूरदरम्यानचा झुरी नाल्यावरील पूल जीर्ण झाला आहे. या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक असल्याने याही मार्गावरची बस बंद करण्यात आली आहे. गडचिरोली व अहेरी आगाराच्या प्रत्येकी एक बस या मार्गाने सोडली जात होती. मात्र नाल्यावरील पूल जीर्ण झाला असल्याने दोन्ही बसेस आपापल्या मार्गाने काही दुरपर्यंतच येतात. सदर मार्गावरील अडथळे दूर करावे, अशी मागणी होत आहे.
खराब रस्त्यांमुळे पाच बसफेऱ्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:26 AM