लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रेती वाहतूकदाराकडून पैसे लुटणे तसेच दुसऱ्या एका व्यक्तीच्या घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीच्या पाच पदाधिकाऱ्यांना चामोर्शी पोलिसांनी गुरूवारी अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.विवेक नारायण बारसिंगे (४७) रा.विवेक नगर चंद्रपूर, आरिफ पिरमहम्मद कनोजे (३५) रा. सुभाष वॉर्ड गडचिरोली, पंकज प्रदीप बारसिंगे (२८) रा.फुले वॉर्ड, गडचिरोली, मदन दयाळ मडावी (६०) रा.फराडा ता. चामोर्शी, कुणाल खुशालराव पेंदोरकर (२६) रा.रामनगर, गडचिरोली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांकडे मिळालेल्या तक्रारीनुसार, या पाचही आरोपींनी सर्वप्रथम ७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील सगणापूर येथील विनोद लिंगय्या येगलोपवार यांच्या घरी जाऊन तू दारू विकतोस, असे म्हणत शिविगाळ केली. आम्ही कार्यक्रम घेणार आहोत त्यासाठी सात लाख रूपयांचा खर्च असून तू ३० हजार रूपये दे, अशी मागणी केली. येगलोपवार यांनी पैसे देण्यास नकार दिला असता पाचही जणांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर वरील आरोपींनी पुन्हा सगणापूर येथीलच एका महिलेच्या घराची झडती घेतली. तिच्याकडून सुद्धा ३० हजार रूपयांची मागणी केली, असे येगलोपवार यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून चामोर्शी पोलिसांनी पाचही जणांविरोधात कलम ३८४, ४४८, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.दुसऱ्या एका प्रकरणात पाचही आरोपींनी चामोर्शी तालुक्यातीलच दहेगाव येथील रूपेश रामदास चलाख यांचा रेती भरलेला ट्रॅक्टर अडवून एक लाख रूपयांची मागणी केली. एक लाख रूपये न दिल्यास १ लाख ३० हजार रूपयांचा दंड ठोठावू, अशी धमकी दिली. मात्र पैसे देण्यास चलाख यांनी नकार दिला असता, त्यांना मारहाण केली आणि खिशातून १० हजार रूपये काढले, असे रूपेश चलाख यांनी तक्रारीत म्हटले आहे.दोघांच्याही तक्रारीवरून चामोर्शी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली. त्यापैकी आरिफ कनोजे व मदन मडावी हे दोघे रुग्णालयात भरती आहेत.
गडचिरोलीत भ्रष्टाचार निवारण समितीच्या पाच पदाधिकाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 11:13 AM
रेती वाहतूकदाराकडून पैसे लुटणे तसेच दुसऱ्या एका व्यक्तीच्या घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीच्या पाच पदाधिकाऱ्यांना चामोर्शी पोलिसांनी गुरूवारी अटक केली.
ठळक मुद्देलुटमारीचा आरोप रेती वाहतुकदाराकडून जबरीने घेतले पैसे