संजय तिपाले, गडचिरोली: सप्टेंबर २०२२ मध्ये येथे झालेल्या पोलिस भरतीत पात्र ठरलेल्या काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे उजेडात आले आहे. त्यावरून गडचिरोलीत फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यात तीन उमेदवारांसह अन्य दोघांचा समावेश असून एक उमेदवार अद्याप फरार आहे.
सप्टेंबर २०२२ मधील पोलिस भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी केली जाते. छाननीदरम्यान हा प्रकार समोर आला. यात चार उमेदवारांनी जोडलेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रे हे खोट्या कागदपत्राद्वारे मिळवल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात चार उमेदवार असून यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. एक उमेदवार फरार असून अन्य दोघे ताब्यात आहेत. प्रशिक्षणाला जाण्याआधी अटक झाल्याने या उमेदवारांचे पोलिस होण्याचे स्वप्न धुळीला मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, बनावट प्रमाणपत्रांचे बीड व नांदेड कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली असून मोठे रॅकेट उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास पथक कामाला लागले आहे. त्यामुळे आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.---या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन उमेदवार ताब्यात असून एकाचा शोध सुरू आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील खोटे प्रमाणपत्र जोडल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखा तपास करत आहे.- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक गडचिरोली