विद्यार्थ्यांचे दाखले थांबविले : प्रशासनाकडून हालचाली वाढल्यागडचिरोली : इयत्ता चौथीपर्यंत असणाऱ्या नगर परिषद व जिल्हा परिषद शाळांना पाचवा वर्ग जोडण्याबाबतचे धोरण राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतले आहे. त्यानुसार गडचिरोली नगर पालिका प्रशासनाने तीन प्राथमिक शाळांना सन २०१६-१७ या शैक्षणिक सत्रापासून पाचवा वर्ग जोडण्यास मंजुरी दिली आहे. त्याअनुषंगाने या शाळांमध्ये इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याबाबतचे प्रमाणपत्र थांबविण्याचे तोंडी निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने पालिका प्रशासनाच्या हालचाली वाढल्या आहेत. पुढील शैक्षणिक सत्रापासून सावित्रीबाई फुले न.प. प्राथमिक शाळा गोकुलनगर, इंदिरा गांधी न.प. प्राथमिक शाळा व महात्मा गांधी न.प. प्राथमिक शाळा येथे पाचवा वर्ग जोडण्यात येणार आहे. गडचिरोली नगर पालिकेच्या शहरात एकूण १० शाळा आहेत. यापैकी दोन शाळांमध्ये आठवी, एका शाळेमध्ये सातवी व एका शाळेमध्ये इयत्ता पाचवीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षणाची सुविधा असणाऱ्या पालिकेच्या एकूण सहा शाळा आहेत. यापैकी तीन शाळांमध्ये पुढील शैक्षणिक सत्रापासून पाचवा वर्ग जोडण्यास न.प. प्रशासनाने मंजुरी दिली आहे. उर्वरित तीन शाळांपैकी एक ते दोन शाळांमध्ये पुन्हा पाचवा वर्ग जोडण्याचे नियोजनही पालिका प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. याशिवाय शहरातील सर्वच १० शाळा १०० टक्के डिजीटल करण्यासाठी पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)खासगी शाळांतील शिक्षकांची पंचाईतखासगी व्यवस्थापनांच्या अनुदानित व विनाअनुदानित उच्च प्राथमिक शाळा शहरात अनेक आहेत. या शाळेतील शिक्षक दरवर्षी इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले पालिकेच्या शाळांमधून मिळवित होते. मात्र यंदा पालिका प्रशासनाने इयत्ता चौथीला पाचवा वर्ग जोडण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले देण्याची कार्यवाही तुर्तास थांबविण्यात आली आहे. परिणामी खासगी शाळांतील शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठी प्रचंड पंचाईत झाली आहे. शाळांच्या दर्जानुसार प्रवेशीत विद्यार्थ्यांचे रेटशहरातील नामांकित व दर्जेदार शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संबंधित विद्यार्थी व पालकांना एक हजार रूपयाचे आमिष दाखविले जात आहे. त्या खालोखाल दर्जा असलेल्या शाळांकडून दोन ते तीन हजार रूपये तसेच यापेक्षाही दर्जा कमी असलेल्या शाळांच्या शिक्षकांकडून चार ते पाच हजार रूपयांचे आमिष विद्यार्थी व पालकांना दाखविले जात आहे. शाळांच्या दर्जानुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून इयत्ता पाचवीच्या प्रवेशासाठी आमिष दाखविले जात आहे.विद्यार्थी प्रवेशासाठी प्रलोभनखासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार नोकरी टिकविण्यासाठी खासगी शाळांमधील शिक्षक शहरात विद्यार्थी प्रवेशासाठी फिरत आहेत. इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रोख रक्कम, गणेवश, सायकल, बूट व इतर वस्तुंचेही आमिष दाखविले जात आहे.
पालिकेच्या तीन प्राथमिक शाळेत होणार पाचवा वर्ग
By admin | Published: May 14, 2016 1:13 AM