लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : महावितरणने सुरू केलेल्या वीज बिल याेजनेचा लाभ घेत जिल्ह्यातील जवळपास ५ हजार शेतकरीवीज बिल मुक्त झाले आहेत. त्यांनी ७ काेटी रुपयांचा भरणा महावितरणकडे केला आहे. महाकृषी ऊर्जा धोरण २०२० अंतर्गत कृषिपंपधारकांना वीज बिलात सवलत दिली जात आहे. चंद्रपूर परिमंडळांतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे. यात चंद्रपूर, वरोरा, ब्रह्मपुरी, गडचिराेली व आलापल्ली विभागांचा समावेश आहे. ऑक्टोबर २०२० पासून चंद्रपूर परिमंडळांतर्गत येणाऱ्या ४२ हजार ७९६ कृषिपंप ग्राहकांनी ३९ कोटी ५२ लाख रुपयांचा भरणा करीत थकबाकीमुक्तीच्या दिशेने पावले टाकली. तर २० हजार ७९ कृषिपंपधारकांनी २१ कोटी ३ लाखांचा भरणा करीत आपले वीज बिल कोरे करून घेतले.
मूलभूत सुविधांसाठी ३० काेटी खर्चचंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कृषिपंपधारकांकडून भरल्या गेलेल्या ४४ कोटी ५० लाखांच्या वीज बिलाच्या रकमेतून ६६ टक्के म्हणजे एकूण २९ कोटी ३७ लाख रुपये कृषी ग्राहकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खर्च हाेणार आहेत. यात प्रामुख्याने नवीन रोहित्रे बसविणे, नवीन वीजजोडण्या देणे, नवीन अतिरिक्त रोहित्रे बसविणे इत्यादी कामांचा समावेश आहे. आतापर्यंत ३ हजार ३४६ कृषी ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कृषिपंपधारक ग्राहकांना एकीकडे थकबाकीमुक्त होण्याची संधी, तर दुसरीकडे त्यांच्या जिल्ह्यांचा व गावांचा विकास साधला जाण्याचे महत्त्वाचे सत्कार्य घडणार आहे. ३१ मार्च २०२२ पूर्वी थकबाकी व वीज बिलामध्ये ५० टक्के माफी मिळविण्याच्या या संधीचा लाभ घ्यावा. -सुनील देशपांडे, मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ