लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : अहेरी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या आत्मसमर्पित नक्षल्यांची वस्ती शांतीनिकेतनमध्ये पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला वस्तीतील सर्व आत्मसमर्पित नक्षली उपस्थित होते.एकेकाळी हातात बंदूका घेऊन नक्षल चळवळीतील हे सदस्य लोकांचे मुडदे पाडत होते. लोकशाहीवर विश्वास नसल्याने प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दुर्गम भागातील शाळा, महाविद्यालयांमध्ये काळा ध्वज जबरदस्तीने फडकावित होते. मात्र याच नक्षल्यांचे आता मनपरिवर्तन झाले असून लोकशाहीवरील त्यांचा विश्वास वाढायला लागला आहे.प्राणहिता पोलीस मुख्यालयाजवळ आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे सुमारे २५ कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांच्या वस्तीला शांतीनिकेतन हे नाव देण्यात आले आहे. उडाण फाऊंडेशनच्या मदतीने २६ जानेवारी रोजी या ठिकाणी ध्वजारोहण करण्याचे नियोजन करण्यात आले. ध्वजारोहणाबाबतची माहिती आत्मसमर्पितांना देण्यात आली. ते एका शब्दावर तयार झाले. महिलांनी भल्या पहाटे उठून घरासमोर सडासारवण करून अंगणात रांगोळी टाकली. आपल्या लहान मुलांना नवीन कपडे घालून तिरंगा फडकविण्याच्या ठिकाणी जमल्या होत्या. दिवाळी उत्सव असावा, याप्रमाणे येथील वातावरण आनंदमय झाले होते. माजी नक्षल रैनू पुंगाटी याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. रैनू पुंगाटी हा नक्षल चळवळीत असताना ‘जनता सरकार’ या नक्षल संघटनेचा अध्यक्ष होता. या कार्यक्रमाला आत्मसमर्पित २५ जोडपे व अंगणवाडीतील २२ चिमुकले उपस्थित होते. सदर उपक्रम उडाण फाऊंडेशनचे संतोष मंथनवार, रोमित तोंबर्लावार, डॉ. सलुजा, गुड्डू कुलकर्णी यांच्या पुढाकारातून पार पडला.२० वर्षांपासून सोयीसुविधांची प्रतीक्षाआत्मसमर्पित नक्षल्यांचे वास्तव्य असलेली शांतीनिकेतन (प्रभू सदन) वस्ती २० वर्षांपूर्वी अस्तित्त्वात आली. मात्र २० वर्षानंतरही या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या नाहीत. या वस्तीत पाण्याची सुविधा नाही. पक्के रस्ते नाहीत. शिक्षणाची सोय नाही. लोकशाही व प्रशासनावर विश्वास ठेवत या नक्षल्यांनी नक्षल चळवळीला रामराम ठोकला. वस्ती स्थापन करतेवेळी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन पोलीस विभाग व इतर विभागांनी दिले होते. मात्र २० वर्षांच्या कालावधीतही या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात याव्या, यासाठी आत्मसमर्पित नक्षल्यांनी अनेकवेळा पोलीस विभाग व इतर विभागांकडे पाठपुरावा केला. मात्र याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. ही खंत येथील नागरिकांनी बोलून दाखविली.
आत्मसमर्पित नक्षल्यांच्या वस्तीत फडकला तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 10:13 PM
अहेरी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या आत्मसमर्पित नक्षल्यांची वस्ती शांतीनिकेतनमध्ये पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला वस्तीतील सर्व आत्मसमर्पित नक्षली उपस्थित होते.
ठळक मुद्दे २० वर्षानंतर पहिल्यांदाच ध्वजारोहण : कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता आनंद