कुरखेडा येथील काही पूरग्रस्तांना नवीन बसस्थानकामागे असलेल्या मोकळ्या जागेत भूखंड देण्यात आले हाेते; मात्र काही लाभार्थ्यांच्या भूखंडाची वारंवार अदलाबदली झाल्याने पूरबाधितांमध्ये नाराजी हाेती. या संदर्भात येथील वंचित पूरग्रस्तांनी आमदार कृष्णा गजबे यांना निवेदन देऊन समस्या मार्गी लावण्याची मागणी केली हाेती. त्यानुसार मंगळवारी आमदार गजबे यांनी तहसीलदार सोमनाथ माळी यांच्या दालनात बैठक घेतली. दरम्यान, पूरग्रस्तांच्या बाजूने आमदार गजबे यांनी बाजू मांडली आणि त्यांना मिळणाऱ्या भूखंडाचे मोजमाप तत्काळ करून देण्याबद्दल तहसीलदार सोमनाथ माळी यांना सूचना केली. यावेळी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन तहसीलदार माळी यानी दिले. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पूरग्रस्तांचा भूखंडाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत मिळणार आहे.
कुरखेडा नगरपंचायतीच्या माध्यमातून बांधकामाची परवानगी घेऊन किंवा शासनाच्या घरकुल योजनेतून हक्काचे घर बांधण्यास पूरग्रस्तांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बैठकीला तहसीलदार साेमनाथ माळी, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू हुसैनी, पूरग्रस्त भूखंडधारक संदीप देशमुख, कुंदा नंदनवार, यादव वझे, रुखमा मेश्राम, रामदास मस्के, आदी उपस्थित होते.