लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शनिवारपासून जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्याने भामरागड तालुक्यातील मार्ग वगळता सर्वच मार्ग सुरू झाले आहेत. मात्र भामरागड तालुक्याची सीमारेषा असलेल्या बांडे नदीच्या पुलावर तसेच भामरागडला लागून असलेल्या पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी असल्याने भामरागड तालुका अजुनही संपर्काबाहेर आहे.बुधवारपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने कहर केला. काही तालुक्यांमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत होते बहुतांश ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. गडचिरोली-मूल मार्ग वगळता सर्वच मार्ग ठप्प पडले होते. वाहतूक बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र पावसाने शनिवारपासून उसंत घेतली. त्यामुळे पूर ओसरण्यास शनिवारपासूनच सुरूवात झाली. रविवारी सकाळी सर्वच मार्ग सुरळीत सुरू झाले होते.इंद्रावती नदीला पूर आल्याने पर्लकोटा नदीला दाब येऊन पर्लकोटाचे पाणी भामरागडात तीन दिवसांपूर्वी शिरले. इंद्रावती अजुनही धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने भामरागड येथील पूर कायम आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने जवळपास ५०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. भामरागड तालुक्याची सीमारेषा असलेल्या बांडे नदीच्या पुलावरून रविवारी सायंकाळपर्यंत तीन फूट पाणी वाहत होते. त्यामुळे भामरागड तालुक्यातील १२८ गावांचा संपर्क तुटला होता. रविवारी रात्री ७ वाजता पूर ओसरला व मार्ग सुरू झाला. पुरामुळे त्रस्त झालेले भामरागड येथील व तालुक्यातील नागरिक पूर कमी होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. रविवारी रात्री उशीरापर्यंत पर्लकोटाचा पूर ओसरला नव्हता.कुरखेडा : मालेवाडा येथील टिपागडी नदीला शनिवारी पूर आला. पाणी वनवसाहत व मरेगाव वार्डात शिरले. खबरदारीचा उपाय म्हणून जवळपास २५ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. पुलावरून पाच फूट पाणी असल्याने मालेवाडा-मुरूमगाव मार्गावरची वाहतूक ठप्प पडली होती. कुरखेडाचे तहसीलदार रवींद्र चव्हाण, मालेवाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी बचावकार्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.पुरात अडकलेल्यांची पोलिसांच्या मदतीने सुटकागोदावरी नदीच्या पुरात चार मेंढपाळ अडकले असल्याची माहिती तेलंगणा राज्यातील काटाराम येथील पोलिसांनी आसरअल्ली पोलिसांना दिली. त्यांना बाहेर काढण्यासाठी आसरअल्ली पोलीस स्टेशनकडे मदतीची मागणी केली. पोलिसांनी वन विभागाची बोट घेऊन सोमनपल्ली ते तेलंगणा राज्यातील पंकेना असा नदी प्रवाहाच्या उलट्या दिशेने प्रवास केला व चारही नागरिकांना सुखरूप काढले. हे सर्व नागरिक तेलंगणा राज्यातील महादेवपूर तालुक्यातील राफेल्लीकोटा येथील आहेत. मारावेनी कोमरय्या लच्छय्या (३०), मारावेनी रमेश लच्छय्या (२७), बट्टी लिंगय्या कतरसल्ला (५०), बक्तरल्ला कोमरय्या चिमन्ना (३५), पंचिका गटय्या अंकय्या (३८), बट्टी सत्यम लिंगय्या अशी सुखरूप बाहेर काढलेल्यांची नावे आहेत. या मेंढपाळासोबतच ५०० मेंढ्या सुध्दा पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढल्या आहेत. पुरात सापडलेले नागरिक घाबरले होते. मात्र नदी ओलांडून किनाऱ्यावर पोहोचताच त्यांच्या चेहºयावर हास्य उमटले. त्यांनी पोलिसांचे आभार मानेल.मेडिगड्डाचे ८२ दरवाजे उघडलेगोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने मेडिगड्डा धरण बांधले आहे. सदर धरण पूर्णपणे भरल्याने या धरणाचे संपूर्ण ८२ दरवाजे रविवारी पहाटेच्या सुमारास उघडण्यात आले आहेत. अचानक पाणी सोडल्याने धरणाच्या खालील भागात असलेल्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. एकावेळेवर दरवाजे उघडण्यात येऊ नये, तसेच दरवाजे उघडण्यापूर्वी नागरिकांना पूर्वसूचना द्यावी, जेणेकरून नागरिक पूर परिस्थितीबाबत सतर्क राहतील.
भामरागडला पुराचा वेढा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 6:00 AM
इंद्रावती नदीला पूर आल्याने पर्लकोटा नदीला दाब येऊन पर्लकोटाचे पाणी भामरागडात तीन दिवसांपूर्वी शिरले. इंद्रावती अजुनही धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने भामरागड येथील पूर कायम आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने जवळपास ५०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.
ठळक मुद्देसलग तिसरा दिवस : जिल्ह्यातील बहुतांश मार्गांवरील वाहतूक सुरू; पावसाने घेतली आहे उसंत