लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तीन ते चार दिवस गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत करणारी पूरपरिस्थिती बुधवारी पूर्वपदावर आली. गोसेखुर्दमधील विसर्ग बराच कमी केल्यामुळे वैनगंगा नदीसह अनेक उपनद्यांना आलेला पूर ओसरला आहे. मात्र जलमय झालेल्या परिसरात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचण्यासोबतच पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे आणि संभावित रोगराईला रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पाऊस नसतानाही केवळ धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या या अभूतपूर्व पूरपरिस्थितीचा फटका नागरी वस्त्यांसह शेतातील पीकांनाही बसला आहे. अनेक भागात शेकडो हेक्टरवरील धान, कापूस आणि इतर पीक तीन दिवस पुराच्या पाण्यात राहिल्याने ते मरणासन्न झाले असून वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
पुराच्या पाण्याचा गाळ अनेक गावांमध्ये साचला आहे. या पूरपरिस्थितीनंतर पाऊस बरसला असता तर तो गाळ वाहून गेला असता, पण पाऊस नसल्यामुळे गाळ सर्वत्र पसरलेला आहे. पाण्याचे डबकेही साचले आहेत. त्यात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे.याशिवाय ठिकठिकाणचे पाण्याचे स्त्रोत पुराच्या पाण्याने दुषित झाले आहेत. त्यांचे निर्जंंतुकीकरण करून गावागावांत फवारणी न केल्यास साथरोगाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पूर परिस्थितीला जबाबदार कोण?भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून तीन दिवस तब्बल २० ते ३० हजार क्युमेक्सपर्यंत विसर्ग झाल्याने वैनगंगा नदीला आणि तिच्या सर्व उपनद्यांना महापूर आला. यामुळे भंडारा, गोंदियासह गडचिरोली जिल्ह्यात जीवित आणि वित्तहाणी झाली. शेतकऱ्यांसह अनेकांना मोठा फटका बसला. या सर्व नुकसानीसाठी जबाबदार कोण? असा प्रश्न आता विचारला जात आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यप्रदेशातील संजय सरोवरातून सोडलेल्या पाण्यामुळे ही सर्व परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले.
त्यांचे नियोजन आणि तयारी व्यवस्थित नसल्यामुळे त्याचा फटका महाराष्ट्रातील धरण आणि नद्यांना बसला असल्याचे ते गडचिरोलीत बोलताना म्हणाले. ज्यांचे यात नुकसान झाले त्यापैकी काही लोकांनी आता न्यायालयाचे दार ठोठावण्याची तयारी सुरू केली असून पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.