गडचिरोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याकरिता शिक्षकांना प्रेरणा देणे आवश्यक आहे. त्यानंतरच विद्यार्थ्यांचे वर्तनबदल होईल, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर द्या, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत बुधवारी आयोजित कार्यशाळा व चर्चासत्रात केंद्रप्रमुखांना करण्यात आले. डायटमध्ये घेण्यात आलेल्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयावर आधारित चर्चासत्र व कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ अधिव्याख्याता रवींद्र रमतकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डायटचे प्राचार्य बी. जी. चौरे होते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांना प्रेरणा देणे आवश्यक आहे. या दृष्टीने नियोजन करावे, असे आवाहन रवींद्र रमतकर यांनी केले. शासन निर्णयातील तरतुदी व इतर शासन निर्णयाची माहिती प्राचार्य बी. जी. चौरे यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांनी सतर्क राहून विविध उपक्रम व कार्यक्रम शाळा स्तरावर राबवावेत तसेच त्यांच्या सुप्त गुणांना वाव द्यावा, असे आवाहन केले.चर्चासत्रात शिक्षणाधिकारी (प्राथ.) माणिक साखरे, शिक्षणाधिकारी (निरंतर) नीलेश पाटील, मनोहर हेपट, केंद्रप्रमुख गौतम मेश्राम यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी केंद्रप्रमुखांनी तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांनी सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माणिक साखरे यांनी केले. अंधश्रद्धा निर्र्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रूविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेणे गरजचे आहे, असे प्रतिपादन नीलेश पाटील यांनी केले. कार्यप्रेरणा व केंद्रसंमेलन या विषयावर केंद्रप्रमुख गौतम मेश्राम यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ अधिव्याख्याता धनंजय चापले, संचालन अधिव्याख्याता दीपक मेश्राम तर आभार डॉ. नरेश वैद्य यांनी मानले. कार्यशाळेला ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. विनित मत्ते व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर द्या
By admin | Published: July 31, 2015 1:48 AM