लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरू झाल्याने जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जाणार आहेत. सर्व प्रशासकिय यंत्रणांची ऑनलाईन आढावा बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद आणि प्रभारी जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांनी सर्व उपविभागीय दंडााधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत निर्गमित सूचनांची तातडीने आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे आता गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे वेळीच योग्य ती खबरदारी घेण्यासाठी विविध निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे आणि पालन न करणाऱ्यांना दंड आकारण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील आणि तालुक्यावरून व्हीसीद्वारे सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हयात पुन्हा लॉकडाऊन लागू नये म्हणून आम्ही काही प्रमाणात कडक स्वरूपात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहोत. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे सर्वांचे अर्थिक नुकसान झाले. पुढेही असे होवू नये म्हणून आपण आत्ताच खबरदारी घेत आहोत. मास्क वापरून तसेच शारीरिक आंतर राखून आपला सार्वजनिक ठिकाणी वावर करुया. यामुळे कोणालाही दंड होणार नाही तसेच कोरोनालाही रोखण्यात यश येईल.- कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी
नागरिक, व्यावसायिकांसाठी अशी आहे दंडाची रक्कमबैठकीत ठरल्याप्रमाणे नाकातोंडावर मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. मंगल कार्यालये, मॉल तसेच सिनेमागृह या ठिकाणी कोरोनाबाबत काळजी न घेणाऱ्या मालकांना ५ हजार रुपये दंड, तसेच इतर दुकाने, हॉटेल, जिमखाना या ठिकाणी नियमांची अंमलबजावणी न केल्यास दुकान मालकांना २ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.