पाणी टाकीची सुरक्षा वाऱ्यावर
गडचिरोली : शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासन गंभीर नसल्याने या टाकीच्या परिसरात घाण साचून राहत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बसस्थानकावर गतिरोधक केव्हा लावणार?
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे.
झाडीपट्टीचे नाट्य कलावंत उपेक्षितच
देसाईगंज : ग्रामीण भागात समाज प्रबोधनाचे मुख्य अंग असलेल्या नाटकातील नाट्य कलावंत आजही उपेक्षितच आहेत. कित्येक कलावंतापुढे वृध्दापकाळामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐेरणीवर आहे. शासनाचे मात्र या झाडीपट्टीतील कलावंतांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे.
सिकलसेल संशोधन केंद्र स्थापन करा
एटापल्ली : जिल्ह्यात सिकलसेल वाहक रुग्णांची संख्या १० ते १२ हजारांवर आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्यात सिकलसेलचे प्रमाण जास्त असल्याने सिकलसेल संशोधन केंद्र स्थापन करावे, अशी मागणी होत आहे.
कुटुंब नियोजनाचे प्रमाण वाढले
एटापल्ली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत. पुरूरुमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.
कुंपणाअभावी शेतीचे जनावरांकडून नुकसान
गडचिरोली : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या तारांचा पुरवठा करण्याची मागणी आहे. शेत पिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तारेचे कुंपण महाग असल्याने नागरिक तार खरेदी करू शकत नाहीत.
तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा
गडचिरोली : स्थानिक तहसील कार्यालयात लिपीक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयाच्या मार्फतीने सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने सदर योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा भार वाढला आहे.
मोहझरीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. सदर रस्ते दुरुस्त करावे, त्याचबरोबर नाल्या साफ कराव्या, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणने बनला आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरूस्ती झाली नाही. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
शहरात डुकरांचा बंदोबस्त करा
आलापल्ली : आलापल्ली शहरात डुकरांचा हैदोस वाढला आहे. नगर पंचायतीचे या डुकरांचे दुर्लक्ष होत आहे. डुकरांना पकडून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. नालीमध्ये दिवसभर डुकरांचा वावर राहत असल्याने सभोवतालचे नागरिक त्रस्त झाले आहेत. अहेरी शहरातही गेल्या काही दिवसांपासून माेकाट डुकरे व जनावरांचा हैदाेस वाढला आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासन सुस्त आहे.
कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यापूर्वी अनेकदा सदर मागणी करण्यात आली. पंरतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले.
आलापल्ली-मार्कंडा रस्त्यावर खड्डे
आलापल्ली : मुलचेरा ते मार्कंडा(कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व शाळकरी मुलांना करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अंगणवाड्या भरतात भाड्याच्या खोलीत
गडचिरोली : जिल्हाभरातील १०० वर अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. त्यामुळे या अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरविल्या जात आहेत. शहरात अत्यंत लहान व कौलारू खोलीत अंगणवाडी चालविली जात आहे. बहुतांश मिनी अंगणवाड्यांना इमारत उपलब्ध नाही.
ठेंगण्या व अरुंद पुलाचा प्रश्न कायमच
गडचिरोली : ब्रिटिश काळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील आष्टीचा पूल ठेंगणा व अरूंद असल्यामुळे या पुलावरून आजवर अनेकांचा वाहन कोसळून बळी गेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ठेंगणे व अरुंद पूल हे वाहतुकीसाठी ग्रामीण भागात नेहमीच अडचणीचे ठरलेले आहे.
अंकिसा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील मुख्य मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून आसरअल्लीदरम्यानच्या गावातील नागरिक ये-जा करीत असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे सदर मार्गाची बांधकाम विभागाने दुरूस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था
धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याचे अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही.
सुसाट दुचाकीधारकांवर कारवाई करा
अहेरी : दुचाकीच्या कर्कश आवाजामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वार भरधाव वेगाने वाहन चालवीत असल्याने वाहनांचा कर्कश आवाज शहरातील नागरिकांना ऐकावा लागत आहे.
रस्ते अतिक्रमणांच्या विळख्यात
घोट : शेतीकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पांदण रस्ता म्हटले जाते. या पांदण रस्त्यांवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शेतीकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. सर्व्हे करून या मार्गाचे रोहयोतून बांधकाम करावे, अशी मागणी आहे.
ऑनलाईन सातबारा झाला डोकेदुखी
ठाणेगाव : ऑनलाईन सातबारा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा तलाठी कार्यालयामार्फत पुरवावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
अवैध ले-आऊटचा गोरखधंदा जोरात
मुलचेरा : मुलचेरा शहरात अनेक भूमाफियांच्या माध्यमातून सरकारी जमिनीवर प्लॉट पाडून अवैधरित्या कब्जा करून सदर प्लॉट विक्री करण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र याकडे नगर विकास व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अवैध ले-आऊटचा धंदा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
आवश्यक त्या ठिकाणी विद्युत खांब द्या
अहेरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाढीव विद्युत खांब लावून वीज पुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागात रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.
मुलचेरा शहरात पाळीव डुकरांचा हैदोस
मुलचेरा : तालुका मुख्यालयी पाळीव डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
समाजकल्याण विभागाचे वसतिगृह हवे
आरमोरी : आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे वसतिगृह निर्माण करण्याची गरज आहे.
भरधाव वाहनांवर कारवाई थंडबस्त्यात
आलापल्ली : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे अनेक अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र प्रशासनाकडून होणारी कारवाई थंडबस्त्यात आहे.
भामरागड तालुक्यातील गावे लाईनमनअभावी
भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एका लाईनमकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे त्यांना प्रत्येक गावी सारखाच वेळ देऊ शकत नाही.
प्रवासी निवाऱ्याला झुडपांचा वेढा
मुलचेरा : तालुक्यातील शांतीग्राम येथे प्रवासी निवारा बांधण्यात आला आहे. मात्र या निवाऱ्याच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. निवाऱ्याला झुडपांनी वेढले आहे. त्यामुळे प्रवासी निवाऱ्यात बसू शकत नाही. उन्हातच बसची वाट बघत बसावे लागते. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाच्या वतीने प्रवासी निवाऱ्याची दुरूस्ती केली जात नाही.
रिक्त पदांमुळे होतोय कामांवर परिणाम
गडचिरोली : स्थानिक तहसील कार्यालयात लिपीक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयाच्या मार्फतीने सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने सदर योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा भार वाढला आहे.
आठवडी बाजारात ओट्यांची निर्मिती करा
घोट : चामोर्शी तालुक्यातील घोट येथे मंगळवारी आठवडी बाजार भरतो. परिसरातील शेकडो नागरिक वस्तूच्या खरेदी-विक्रीसाठी बाजारात येतात. मात्र या बाजारात ओट्याची व्यवस्था नसल्याने विक्रेत्यासह ग्राहकांना त्रास होत आहे.
जिल्हा परिषदेसमोर वाढले अतिक्रमण
गडचिरोली : जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूला काही दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. मात्र या दुकानदारांवर कोणतीही कारवाई बांधकाम विभाग तसेच नगर परिषद प्रशासन करीत नसल्याने या रस्त्याच्या दोन्ही बाजुला जागा पकडून दुकाने थाटली जात आहेत.
काेराेेनाच्या दुसऱ्या लाटेची चिंता
गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यात काही दिवसानंतर दुसरी लाट आल्यास पुन्हा व्यवहार ठप्प पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेर पडताना याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. आराेग्य विभागामार्फत जागृती केली जात असले तरी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.